पालीत विकासाच्या नावाची बोंबाबोंब

नेत्यांची बोलाचा भात अन बोलाची कडी
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील पाली हे मुख्यालयाचे ठिकाण आहे. तसेच अष्टविनायक धार्मिक स्थळ देखील पालीत आहे. अशातच पालीत विकासाच्या नावाची बोंबाबोंब दिसून येते, येथे मूलभूत व पायाभूत सेवा सुविधांची वानवा आहे तर नेते, लोकप्रतिनिधी, प्रशासन यांचा बोलाचा भात अन बोलाची कडीच दिसून येते. पालीत सार्वजनिक स्वच्छतागृहाभावी महिला, युवती विद्यार्थिनीची प्रचंड कुचंबना होत आहे, नैसर्गिक विधी करायचा कुठे, महिला पुरुषांची अक्षरश तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी परिस्थिती होतेय. सुधागड तालुक्यातील व तालुक्याबाहेरील नागरीक रोजची खरेदी, शासकीय कामे करण्यासाठी तसेच विद्यार्थी शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी , रुग्ण दवाखान्यासाठी पालीत येतात. तसेच तीर्थक्षेत्र असल्याने असंख्य भाविक देखील पालीत नियमित येत असतात. मात्र बाजारात फिरतेवेळी किंवा कुठे जातांना नैसर्गिक विधी करायचा झाल्यास कुठे जावे हा प्रश्‍न त्यांना पडतो. कारण पालीत कुठेच सार्वजनिक स्वच्छतागृह किंवा मुतार्‍या नाही आहेत. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी परिस्तिती अनेकांची होते.विशेषतः यामध्ये महिलांची अक्षरशः कुचंबना होते. अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत ठिकठिकाणी सार्वजनिक स्वछतागृह नाहीत ही खूप मोठी समस्या आहे.पालीत सुचे वांदे झाले आहेत. स्वच्छतागृहाअभावी शासकीय कामांसाठी किंवा खरेदीसाठी बाजारात आलेले नागरिक व भाविक यांची खूप कुचंबना होत आहे. त्यामुळे पालीत महत्वाच्या ठिकाणी तसेच नाक्यांवर सार्वजनिक स्वच्छतागृह व मुतार्‍या बांधाव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


स्वच्छता गृहाची उपलब्दता नसल्याने नागरिकांना अक्षरशः पोट दाबूनच त्यांना हा त्रास सहन करावा लागतो. ज्या व्यापार्‍यांच्या दुकानात स्वच्छतागृह नाहीत त्यांची देखील गैरसोय होते. मधुमेह व मुतखडा असलेल्या लोकांना सुध्दा खूप त्रास होतो. एकवेळ पुरुष मंडळी कुठेतरी निभावून घेतात मात्र वृद्ध व स्त्रियांचे तर खूपच हाल होतात. आदिवासी व्यवसायिक महिला यांचे तर स्वछताग्रहा अभावी प्रचंड हाल होतात, तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था महिलांची होते. पालीत बल्लाळेश्‍वर देवस्थानच्या वतीने भक्तनिवास क्रमांक 1 जवळ स्वच्छतागृह व मुतारी आहे. मात्र भाविकांसाठी ते बनविले आहेत. भाविकांबरोबरच जवळचे काही लोक व व्यवसायिक त्यांचा वापर करतात. मात्र त्यांचा वापर पादचारी व इतर लोकांना शक्य नाही आणि त्यांची निर्मिती देखील त्या उद्देशाने केलेली नाही. अटीतटीच्या वेळी काही लोक बस स्थानकातील स्वच्छतागृहाच उपयोग करतात. मात्र या स्वच्छतागृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. मात्र तिथे नियमित अस्वच्छता असते त्यामुळे तिथेही नागरिकांची गैरसोय असते. शिवाय बस स्थानकापासून दूरवर असलेल्या नागरिकांना त्याचा काही फायदा नाही. पालीत दर्ग्यानजीक असलेल्या स्वच्छता गृहांची तर प्रचंड दुरावस्था झाली आहे. त्याची सुधारणा केल्यास त्याचा वापर होण्यासारखे आहे.पालीत ठराविक ठिकाणी स्त्रिया व पुरुषांसाठी मुतार्‍या स्वच्छतागृह असणे ही अतिशय महत्त्वाची गरज निर्माण झाली आहे.


जुन्या मुतार्‍यांची दुरावस्था
काही वर्षांपूर्वी पालीत ठिकठिकाणी जसे जुने पोलीस स्थानक, मधली आळीतील लवाटे चौक आदी ठिकाणी सार्वजनिक मुतार्‍या होत्या. काही ठिकाणी सिमेंटच्या पाईपच्या मुतार्‍या देखील होत्या. त्यामुळे लोकांची काही प्रमाणात सोय होत होती. मात्र सध्या या मुतार्‍यांची पडझड झाली आहे. त्या वापरण्यायोग्य राहिलेल्या नाहीत. परिणामी नव्याने मुतार्‍या व स्वच्छतागृहाची गरज निर्माण झाली आहे.

Exit mobile version