ताजपुर येथे श्री हनुमान मंदिराचे जीर्णोद्धार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गावकीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद न ठेवता एकी कायम ठेवा तरच गावचा सर्वांगिण विकास होऊ शकतो असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले.
आज ताजपुर येथे श्री हनुमान मंदिराचे जीर्णोद्धार उद्घाटन मोठ्या थाटामाटात पार पडले प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्यासह माजी आमदार सुभाष तथा पंडित पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते तथा शेकापचे जिल्हा चिटणीस अॅड आस्वाद पाटील, शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद सदस्य मधू पारधी, शेतकरी कामगार पक्ष तालुका चिटणीस अनिल पाटील, माजी उपसभापती संदीप घरत, पंचायत समिती सदस्य सुभाष वागळे, शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे यांच्यासह ताजपुर ग्रामस्थ आणि आणि इतर मंडळी उपस्थित होती.
ताजपूर ग्रामस्थ तीन पिढया शेकापक्षाबरोबर ठाम सोबत राहिले आहेत. त्यांचा मला अभिमान आहे. आता चौथी पिढी मी तुम्हाला दिली आहे. माझ्यापेक्षा जास्त चित्रलेखा पाटील, आस्वाद पाटील जास्त व्यक्तिगत संपर्क ठेवून असतात. कुठेही राजकारण न करता ते काम करत असल्याबाबत मला कौतुक आहे. तालुक्यात फक्त पाटील कंपनी आहे. कुणाचेही भले करायचे आहे तर पाटील पुढे असतात. राजकारण वापर करून फेकुन देण्याचे काम आपले नाही. चांगल्या दर्जाचे मंदिर उभे केल्या बद्दल ग्रामस्थांचेही त्यांनी कौतुक केले. कंत्राटदार आणि कामगारांची चांगली व्यवस्था केली. गावात चांगली एकी ठेवली असल्याने त्यांनी ग्रामस्थ आणि पंचमंडळींना आवर्जून धन्यवाद देत ही एकी कायम ठेवण्याचे आवाहन केले. गावकीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद आणू नका. या मंदिराचा समावेश आपण पर्यटन विकासात करणार असून त्यातून आणखी विकास करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.