प्रचार सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
। अलिबाग । प्रतिनिधी ।
चेंढरे ग्रामपंचायतीचा विकास हा शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातूनच झाला आहे. येथील रस्ते, पाणी व इतर सुविधा पक्षाच्या मार्फतच देण्यात आल्या आहेत. चेंढरे पंचायत समितीच्या सदस्यांसह आमदार शिंदे गटातील असताना, त्यांनी पाच वर्षांत चेंढरेच्या विकासाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे चेंढरेतील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. चेंढरेचा विकास, हाच ध्यास घेऊन काम करणार, असा विश्वास चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी शुक्रवारी (दि.15) व्यक्त केला.
महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पाटील यांच्या निवासस्थानासमोर बैठकीचे आयोजन करण्यात आली. यावेळी चिऊताई बोलत होत्या.
यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पाटील, प्रियदर्शनी पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अॅड. गौतम पाटील, चेंढरेच्या माजी सरपंच स्वाती पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख शंकर गुरव, चेंढरेचे माजी उपसरपंच यतीन घरत, प्रशांत फुलगावकर, अॅड. परेश देशमुख, एस.एम. पाटील, दत्ता ढवळे, नागेश कुलकर्णी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई म्हणाल्या की, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा आहे. राज्यातील राजकारण गेल्या पाच वर्षांत बदलले आहे. त्याचा नाहक त्रास सर्वसामान्य जनतेला झाला आहे. ज्यांना निवडून दिले, त्यांनी जनतेची दिशाभूल करीत बंडखोरी केली. स्वतःच्या स्वार्थासाठी बंडखोरी करणार्या या चोरांना महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही. अलिबाग-मुरूड-रोहा विधानसभा मतदारसंघात होणारी ही निवडणुकीची लढाई एका चोरासोबत असल्याचे दुःख आहे, असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या, संजय पाटील, प्रियदर्शनी पाटील, यतीन घरत, अॅड. परेश देशमुख यांच्यासारख्या अनेक शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चेंढरेमध्ये एक वेगळी फळी निर्माण केली. पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा कायमच प्रयत्न केला. परंतु, चेंढरेतील प्रश्नांची सोडवणूक करण्यास आमदार महेंद्र दळवी अपयशी ठरले आहेत. आमदारांनी फक्त भूलथापा मारल्या, वेगवेगळी आमिषं दाखविली. प्रत्यक्षात मात्र कोणतीही कामे केली नाही, ही चिंतेची बाब आहे. मोठ्या आशेने मतदारांनी त्यांना निवडून दिले. परंतु, गेल्या पाच वर्षांत आमदारांनी काय केले, असा सवाल येथील जनता उपस्थित करीत आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीवर आमदारांनी स्थगिती आणून बेरोजारांच्या पोटावर पाय दिला. महागाईमुळे येथील महिला त्रस्त झाली आहे. महिला सुरक्षेबरोबरच येथील कचरा भूमी व इतर प्रश्नांची पाच वर्षांत सोडवणूक का केली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. माझ्या शिक्षणाचा उपयोग आमदार म्हणून येथील जनतेच्या विकासासाठी नक्की करेन. चेंढरेचा सन्मान कायमच राखला जाईल. चेंढरेमध्ये सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. हाच वर्ग नवा बदल घडवून आणेल, असा विश्वास चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला.
शिट्टीच्या आवाजाने विरोधकांच्या कानठळ्या बसवा: पाटील
चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या प्रचारार्थ चेंढरेमध्ये रॅली काढण्यात आली. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चित्रलेखा पाटील यांच्यासोबत असल्याचे येथील मतदारांनी रॅलीतूनच दाखवून दिले आहे. चेंढरेमध्ये सुशिक्षित व सुसंस्कृत वर्ग आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील यादेखील सुशिक्षित आहेत. त्यांनी पाच वर्षांत वेगवेगळी कामे केली. त्यामुळे घराघरात चिऊताईंचे नाव पोहोचले आहे. कोरोना काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, अनेकांचे जीव वाचविले. पाणी, शिक्षणाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रचंड मेहनत त्यांनी घेतली. आजच्या या रॅलीतूनच त्यांच्या कामाची पोच पावती उपलब्ध झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला चित्रलेखा पाटील यांना मतदान करून बहुमतांनी निवडून द्या. शिट्टीच्या आवाजाने विरोधकांच्या कानठळ्या बसल्या पाहिजे, असे जिल्हा परिषद माजी सदस्य सजंय पाटील म्हणाले.
प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
चेंढरेतील मतदारांकडून चिऊताई यांचे स्वागत
महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या प्रचारार्थ चेंढरेमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. चेंढरे येथील पाटीलवाडी येथून प्रचारास सुरुवात झाली. आनंदनगर, शिवाजी नगर, गौरव नगर, मूकबधीर विद्यालय, विद्यानगर, गोंधळपाडा, स्वामी समर्थ मठ, सुरुची हॉटेल गल्ली, वरुण सोसायटी, पंतनगर ते जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पाटील यांचे घर अशी ही रॅली काढण्यात आली. रॅलीच्या सोबत दुचाकीवर स्वार होऊन असंख्य कार्यकर्ते, महिला, तरुण सहभागी झाले होते. या रॅलीत युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. चेंढरे ग्रामपंचायत हद्दीत चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांचे आगमन होताच मतदारांकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.