। नेरळ । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील सर्व सहा जिल्हा परिषद प्रभागात मंजूर असलेल्या विकास कामांचा शुभारंभ खा सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य मंडळाची मुदत 20 मार्च रोजी संपत असून 21 मार्च पासून रायगड जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राजवट सुरू होणार आहे. त्यामुळे आजच्या अखेरच्या दिवशी रायगड जिल्हा परिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कर्जत तालुक्यातील विविध विकासकामांचा शुभारंभ कार्यक्रमांचे आयोजन करून करण्यात आला यावेळी जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड, जि.प.उपाध्यक्ष सुधाकर घारे, माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, जिल्हा परिषद सदस्या रेखा देसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धुळे, अशोक भोपतराव, तालुका अध्यक्ष भगवान चंचे, युवक तालुका अध्यक्ष सागर शेळके, महिला तालुका अध्यक्ष रंजना धुळे, माजी नगराध्यक्ष शरद लाड, राजेश लाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कर्जत तालुक्यातील बीड बुद्रुक, सावेळे,पाथरज, खांडस, नेरळ आणि उमरोली या सर्व जिल्हा परिषद गटामध्ये मंजूर असलेल्या विकास कामांचा शुभारंभ यावेळी झाला.त्यात बीड बुद्रुक, कडाव, कोंडीवडे, खांडपे, पाथरज, मोग्रज, कशेळे, खांडस, नांदगाव, हुमगाव, मांडवणे, वैजनाथ, रजपे, दहिवली तर्फे वरेडी, उमरोली, कळंब, आसल, पोशिर, नसरापूर, सावेळे या ग्रामपंचायत मधील विकास कामांचा समावेश आहे.