खोदाई, खडीचे ढिगारे आणि दिशादर्शक फलकांचा अभाव; पर्यटकांसह स्थानिकांचा जीव धोक्यात
| मुरुड | प्रतिनिधी |
मुरुड-जंजिरा किल्ला आणि काशीद समुद्रकिनाऱ्यामुळे पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या मुरुड तालुक्यात सध्या पर्यटकांचे स्वागत निसर्गसौंदर्याऐवजी खोदलेले रस्ते आणि खडीच्या ढिगाऱ्यांनी होत आहे. राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळातर्फे सुरू असलेल्या साळाव-मुरुड मार्गाच्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहनचालक आणि स्थानिक ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक ठिकाणी महिनोन्महिने खोदाई तशीच ठेवण्यात आली असून, धोक्याचे इशारे, दिशादर्शक फलक आणि काम करणाऱ्या कंपनीची माहिती देणारा फलकही नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून पर्यटक मुरुड आणि काशीदकडे येत आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहनांची वर्दळ वाढली आहे. मात्र, काशीद रस्त्यावरील यू-टर्न, काशीद, चिकणी, सर्वे, दांडा, नांदगाव, आयुष हॉस्पिटल, मजगाव आणि विहर परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खोदाई करण्यात आली आहे. काही ठिकाणी खोदलेला भाग बुजवलेला नाही, तर रस्त्यालगत खडीचे ढिगारे पडून आहेत. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना बाजू देताना दुचाकीस्वारांसह लहान वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
रस्त्याचे काँक्रिटीकरण कोणती कंपनी करीत आहे, ठेकेदार कोण, काम पूर्ण करण्याची मुदत किती आणि जबाबदार अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक काय, याची माहिती देणारा फलकही परिसरात दिसत नाही. सार्वजनिक निधीतून सुरू असलेल्या कामात पारदर्शकतेचा अभाव जाणवत असून, कामातील त्रुटींबाबत तक्रार नेमकी कोणाकडे करायची, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
खोदाई सुरू असलेल्या ठिकाणी धोक्याचे इशारे, दिशादर्शक फलक, बॅरिकेड्स आणि रात्री दिसणारी प्रकाशव्यवस्था असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक ठिकाणी या प्राथमिक उपाययोजनांचाही अभाव आहे. विशेषतः मार्गाची माहिती नसलेल्या पर्यटकांना रात्रीच्या वेळी अचानक समोर येणारी खोदाई किंवा अडथळे लक्षात न आल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे.
साळाव-मुरुड मार्ग हा स्थानिकांच्या दैनंदिन प्रवासासह तालुक्याच्या पर्यटन आणि आर्थिक उलाढालीसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे या मार्गावरील गैरसोयीचा फटका पर्यटक, हॉटेल व्यावसायिक, दुकानदार आणि स्थानिकांना बसत आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण स्वागतार्ह असले, तरी विकासकामांच्या नावाखाली नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड होऊ नये. संबंधित यंत्रणेने तातडीने पाहणी करून खोदाई सुरक्षित करावी, खडीचे ढिगारे हटवावेत, धोकादायक ठिकाणी बॅरिकेड्स व दिशादर्शक फलक लावावेत आणि काम करणाऱ्या कंपनीसह ठेकेदार व कामाची मुदत स्पष्ट करणारा माहिती फलक उभारावा, अशी मागणी वाहनचालक आणि ग्रामस्थांकडून होत आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होण्याऐवजी आधीच सुरक्षेची खबरदारी घ्यावी, अशी संतप्त भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
