नेपाळला पर्यटनासाठी गेलेल्यांची केली सुटका
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
रायगड जिल्ह्यातील 58 भाविक नेपाळमध्ये देवदर्शनासाठी गेले होते परंतु तिथे ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकांनी दमदाटी करून तुम्ही सहा लाख रुपये दिल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही असे म्हणत त्यांना डांबून ठेवले होते. नेपाळमध्ये अडकलेल्या या भाविकांनी महाराष्ट्रातल्या विविध नेत्यांना फोन केले, मात्र फारसा प्रतिसाद न आल्याने शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावताच सर्व भाविक सुखरुप रायगड जिल्ह्यातील आपल्या गावी पोचले.
रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कामोठे गावातील 58 भाविक नेपाळमध्ये धार्मिक पर्यटनासाठी गेले होते. 35 महिला आणि 23 पुरुष त्यामध्ये होते. गोरखपूरहून नेपाळपर्यंत सगळे व्यवस्थित पोहोचले. लुंबीनी, पोखरा, जनकपुरी, मनोकामना या ठिकाणी दर्शन घेतले. मात्र, काठमांडूला आल्यावर त्यांना राधाकृष्ण ट्रॅव्हल्सच्या एका बसमध्ये कोंबण्यात आले. भाविकांनी गावाहून निघतानाच सर्व पैसे भरलेले होते. मात्र, त्यांची फसवणूक झाली होती. तुमच्या पर्यटन कंपनीकडून पैसे आले नाहीत. सहा लाख रुपये दिले नाहीत, तर सोडणार नाही, असे या ट्रॅव्हल्सचा मालक अंकीत जायस्वाल आणि त्याच्या साथीदारांनी धमकावयला सुरूवात केली, अशी माहिती पर्यटक संजू म्हात्रे यांनी दिली.
या प्रसंगामुळे काय करायचे हा प्रश्न या भाविकांसमोर उभा राहिला. त्यांनी ओळखीच्या लोकांमार्फत नेत्यांना आणि त्यांच्या स्वीय सहायकांना फोन करायला सुरुवात केली. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळला नाही. शेवटी संजू म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज करून आपल्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला. फडणवीसांनी त्यांना तातडीने प्रतिसाद दिला. सर्व प्रकारची त्यांनी व्यवस्थित त्यांनी माहिती घेतली आणि आपले खासगी सचिव दिलीप राजूरकर आणि दिल्लीतील स्वीय सहायक मनोज मुंडे यांच्याशी संपर्क साधून त्यांना या भाविकांची संपर्क साधण्यास सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांच्या पथकाने मूळचे नेपाळचे असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे माजी स्वीय सहायक संदीप राणा यांना कळविले. राणा यांनी स्वत: या भाविकांची भेट घेतली आणि सर्व भाविकांची व्यवस्था करून विशेष बसने त्यांना गोरखपूरला पोहोचविले.
दरम्यानच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधला होता. त्यामुळे भाविक गोरखपूरला पोहोचल्यावर तेथील जिल्हाधिकारी स्वत: भेटीला आले. त्यांनी दोन दिवस भाविकांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली. त्यांना मुंबईपर्यंत कसे न्यायचे प्रश्न होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून गोरखपूरपासून मुंबईपर्यंत खास बोगी जोडण्याची विनंती केली. रेल्वेने त्याप्रमाणे भाविकांसाठी गोरखपूरहून मुंबईपर्यंत रेल्वेची एक बोगी आरक्षित करू दिली. दोन दिवस प्रवास करून सर्व जण सुखरुपपणे मुंबईला पोहोचले. काठमांडूमध्ये एकटे देवेंद्रजीच आमच्या मदतीला धावून आले, अशी कृतज्ञ भावना या पर्यटकांनी व्यक्त केली.