भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत इच्छा व्यक्त
| मुंबई | प्रतिनिधी |
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. पक्षनेतृत्वाला भेटून ते तशी विनंती करणार आहेत. खुद्द फडणवीस यांनीच बुधवारी (दि.5) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आमचे मुंबईचे अध्यक्ष, राज्याचे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांनी दिवसरात्र काम केलं. कार्यकर्त्यांना उत्साहित करण्याचे काम केले. मात्र, जागा कमी आल्या आहेत ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल, असं फडणवीस म्हणाले.
लोकसभेच्या संपूर्ण निवडणुकीत महाराष्ट्र भाजपचं नेतृत्व मी करत होतो. त्यामुळं जो काही पराभव झाला आहे. जागा कमी आल्या आहेत त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. मी कमी पडलो. हे मी स्वीकारतो. ज्या काही त्रुटी राहिल्या आहेत, त्या भरून काढण्याचा प्रयत्न पुढच्या काळात करणार आहे. विधानसभेच्या तयारीसाठी मला आता पूर्णवेळ उतरायचं आहे. त्यामुळं मला सरकारमधून मुक्त करावे, अशी विनंती पक्षनेतृत्वाला करणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितलं. ‘मला पक्ष संघटनेसाठी पूर्ण वेळ देता यावा या हेतूनं मी तशी इच्छा व्यक्त करणार आहे. त्यांच्या सल्ल्याने मी पुढे काम करेन,’ असंही त्यांनी सांगितले.
संविधान बदलण्याच्या विरोधकांच्या प्रचाराचा जनमानसावर मोठा परिणाम झाला. मराठा आरक्षण देण्यास आलेल्या अपयशाचाही आम्हाला फटका बसला. कांद्याच्या भावाच्या मुद्द्याचाही प्रचार झाला. सरकारने आरक्षण दिल्यानंतरही मराठा आरक्षणाच्या बाबतीत वेगळा प्रचार झाला. त्याला आम्ही प्रभावीपणे उत्तर देऊ शकलो नाही. त्याचा फटका आम्हाला बसला. मराठवाड्यातील निवडणुकीत ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावर झालं, असंही फडणवीस म्हणाले.