| पोलादपूर | शैलेश पालकर |
पोलादपूर तालुक्यातील आतापर्यंतच्या धरणप्रकल्पांच्या अपयशाचे मूळ कारण ठरलेल्या देवळे लघुपाटबंधारे धरण प्रकल्पापासून अन्य प्रकल्प अपयशी कसे करायचे, याबाबत आदर्श घेण्यात आला आहे. 2021 मध्ये अतिवृष्टीदरम्यान देवळे धरणाचा दरवाजा उघडण्यासाठी चावी फिरविण्यासाठी कर्मचारी उपलब्ध झाला नसता तर धरण फुटणार होते. तसेच तिवरे धरणफुटीच्या पार्श्वभूमीवर या देवळे धरणाच्या धोक्याचीही चर्चा मोठ्या प्रमाणात झाली आहे. तालुक्यातील आगामी धरणप्रकल्पांना मारक ठरलेला देवळे लघुपाटबंधारे योजनेचा धरण प्रकल्प आतापर्यंत कोट्यवधी रूपये खर्च होऊनही प्रत्यक्षात कोरडा असताना या योजनेच्या दुरूस्तीसाठी 1 कोटी 33 लक्ष रूपयांचे अंदाजपत्रक 2009 मध्ये मुख्य अभियंता स्थानिक स्तर प्रदेश, पुणे यांच्याकडे 2009 मध्ये पाठविण्यात आले. अंदाजपत्रकाची शेरेपूर्तता होऊन अंदाजपत्रकास मंजुरी मिळताच धरणाच्या दुरूस्तीचे काम करण्याचा प्रस्ताव अधीक्षक अभियंता लघुपाटबंधारे स्थानिक स्तर मंडळ ठाणे यांनी सादर केल्याची माहिती एका अहवालामध्ये नमूद केली.
देवळे लघुपाटबंधारे योजनेला मूळ प्रशासकीय मान्यता 31 मार्च 1981 रोजी केवळ 32 लाख 60 हजार 496 रूपयांची असून, एप्रिल 1994 मध्ये ग्रामविकास व जनसंधारण विभागाकडे ही योजना हस्तांतरीत झाली तेव्हा कामासाठी 1 कोटी 66 लाख 52 हजार 294 रूपये आणि अनुषंगिक खर्चापोटी 42 लाख 2 हजार 890 रूपये अशी एकूण 2 कोटी 8 लाख 55 हजार 184 रूपये अशी सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली. योजनेच्या दुसऱ्या सुधारीत अंदाजपत्रकामध्ये कामासाठी 4 कोटी 68 लाख 1 हजार 876 रूपये आणि अनुषंगिक खर्चापोटी 68 लाख 96 हजार 855 रूपये अशी एकूण 5 कोटी 36 लाख 98 हजार 731 रूपये अशी मंजुरी 31 मार्च 2005 रोजी मिळाली. या देवळे लघुपाटबंधारे योजनेचे काम ब-1 निविदांवर तीन टप्प्यांत व्ही.एस. हांडा आणि आर.के. कन्स्ट्रक्शन या पुणे येथील कंपन्यांना देण्यात आले. या कामाची सुरूवात मार्च 1997 मध्ये झाली. मात्र, बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना भूसंपादनाची रक्कम न मिळाल्याने तसेच भूसंपादनात जमिनीचा दर कमी लावल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी 1998 मध्ये योजनेचे काम बंद केले होते.
यानंतर एस.पी. रेड्डी यांना विभागीय कार्यालयामार्फत पत्र देऊन सबलेटिंग करण्यास मंजुरी दिली. साधारणत: 2001 मध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला अदा केल्यानंतर मे 2003 मध्ये योजनेचे घळभरणीचे काम पूर्ण करून पाणीसाठा करण्यास सुरूवात केली. मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना नाशिक यांच्या मान्यताप्राप्त काटछेदानुसार 30 मीटर लांब आणि 235 मीटर पात्रावरील मातीचा भराव घालून देवळे लघुपाटबंधारे योजनेच्या धरणाची उंची 29.30 मीटर करण्यात आली आहे. यातील मुख्य विमोचक सलोह संधानक पध्दतीचा असून, त्याचा ॲप्रोच कंडयूट 71.20 मीटर लांबीचा आहे. याचे काम दगडी बांधकामात करण्यात आले आहे. डाऊन स्ट्रीम कंडयूट 83 मीटर लांबीचा असून, तो आरसीसी पध्दतीने बांधण्यात आला आहे. धरणाच्या विहिरीचा आतील व्यास 3 मीटर असून, विहीर आरसीसी पद्धतीने बांधण्यात आली आहे. मुख्य विमोचकाचे काम धरणाच्या दरवाजासह पूर्ण झाले आहे. मात्र, हे काम पूर्ण झाल्यानंतर देवळे लघुपाटबंधारे योजनेच्या या धरणात पाणीसाठा होत असल्याची चाचणी घेतल्या-घेतल्याच धरणाची गळती सुरू झाल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रस्तुत प्रतिनिधीस दिली.
देवळे लघुपाटबंधारे योजनेच्या या धरणाचा सांडवा मुक्त पतन पध्दतीचा असून सांडव्याच्या भिंतीचे काम पूर्ण संचय पातळीमध्ये 126 मीटर तळापर्यंतची उंची ठेवून पूर्ण करण्यात आले आहे. यावर फ्लँक वॉल बांधण्यात आली आहे. उर्वरित सांडवा भिंतीचे काम पुढील हंगामात करण्यात येण्याची ग्वाही त्यावेळी देण्यात आली होती, तसा उल्लेख अहवालात नमूद केला आहे. मुख्य विमोचक दाराचे रबर सील मे 2007 मध्ये बदलण्यात आले असून, त्याकाळातही धरणात पाणी गळतीचे प्रमाण लक्षणीय असताना हा उपाय अनाकलनीयरित्या करण्यात आला आहे.
कालव्यांचे फक्त अंदाजपत्रक
या देवळे लघुपाटबंधारे योजनेच्या धरणातून उजवा तीर कालव्याच्या कामाचे अंदाजपत्रक 2004-05 ची दरसूची वापरून 61 लाख 58 हजार 201 रूपये करण्यात आले होते. तर डाव्या तीर कालव्याचे अंदाजपत्रक 21 लाख 12 हजार 355 रूपये करण्यात आले होते. त्यास 7 एप्रिल 2005 अन्वये तांत्रिक मान्यताही प्रदान करण्यात आली. मात्र, पुढे कोणतीही कार्यवाही झाली नाही. या योजनेच्या बुडीत क्षेत्र व पायाक्षेत्रासाठी 12.91.4 हेक्टर क्षेत्र संपादित करून भूसंपादनानंतर संबंधित प्रकल्पग्रस्तांना मोबदलेही प्रदान करण्यात आले असल्याचे या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.
प्रशासनाची अनास्था
मुख्य धरणासह मुख्य विमोचकामधून मोठया प्रमाणात गळती असल्याचे या अहवालामध्ये नमूद करण्यात होते तरीही पावसाळयानंतर अल्पावधीतच हे धरण कोरडे पडत असल्याचा उल्लेख या अहवालात टाळण्यात आला होता. 2009 मध्ये गळती थांबविण्याच्या हेतूने करण्यात आलेल्या दुरूस्ती प्रस्तावाची सद्यःस्थिती पाहण्याची कोणतीही मानसिकता या विभागाकडे नसल्याने तालुक्यातील अन्य ठिकाणी होऊ पाहणारे धरणप्रकल्प ग्रामस्थांच्या विरोधामुळे प्रस्तावित होत नसल्याचे नमूद करून तब्बल 10 वर्षांनंतर नारळफोडी करून भूसंपादनाच्या मोबदल्याविनाच जमिनीवरील झाडे आणि दगडी तसेच माती उत्खननाची सुरूवात झाली आहे.
आटणारे पाणी आणि धरणफुटीचा धोका
2003 पासून आजतागायत पावसाळा संपताच धरणातील पाणीसाठा आटून जातो, तर 2021 साली अतिवृष्टीमुळे या धरणाचा बॅकवॉटरचा साठा पूर्णपणे भरून वाहू लागला असताना धरणाचा 235 मीटर लांबीच्या पात्रावरील 30 मीटर लांब आणि 29.30 मीटर उंचीचा भराव बॅकवॉटरच्या प्रेशरमुळे ढासळून देवळे गावठाणापासून पात्रालगतची लोकवस्ती वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र, धरणाच्या दरवाजाची चावी फिरविण्याची माहिती असलेल्या व्यक्तीने वेळीच सांडवा खुला केल्याने धरणाचा भराव वाहून आपत्ती निर्माण होण्याऐवजी योग्यप्रकारे पाण्याचा विसर्ग होऊन मोठी दुर्घटना टळली होती. या धरणाच्या भरावावर दगडी पिचींग करण्यात आले असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खेकडी वावरताना दिसून आल्याने 2019 साली तत्कालीन तहसीलदार दिप्ती देसाई यांनी तिवरे धरणफुटीच्या पार्श्वभूमीवर या धरणाची पाहणी केली होती.