भाविकांना सेवासुविधा पुरविण्यासाठी देवस्थानचे नियोजन
| पाली/बेणसे । वार्ताहर ।
महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकि प्रख्यात धार्मीक स्थळ व आय.एस.ओ मानांकन प्राप्त असलेल्या पाली बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी (दि.9) गुरुवारी संकष्टी चतुर्थीला पालीत भाविकांची पहाटे पासून रेलचेल दिसून आली. बाप्पाच्या चरणी गणेशभक्त नतमस्तक होऊन धन्य होताना पहावयास मिळाले. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी नेहमीच राज्य व देशातून भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थीत राहतात. यातच वर्षभरात येणार्या प्रत्येक संकष्टीला येवून दर्शन घेणार्यांची संख्या मोठी असते. ते नियमित न चुकता येत असतात. अशातच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या उत्तम सोईसुविधेसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट व प्रशासन नेहमीच दक्ष व सज्ज असते.
माघी महोत्सवापासून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. संकष्टी, अंगारकी चतुर्थी दिनी पालीत भाविक भक्तगणांची मांदीयाळी असते. तर माघी मासोत्सवाला संपुर्ण पाली गाव भाविक भक्तगणांनी फुलून जाते, अंगारकी संकष्टी नंतर आलेल्या संकष्टीला देखील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांची संख्या अधिकच असते. अशावेळी भाविक भक्तगणांची कोणतीही गैरसोय होवू नये, त्यांना शिस्तबध्द पध्दतीने रांगेत दर्शन घेता यावे यासाठी देवस्थान तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती खबरदारी घेत उपाययोजना करण्यात आली होती.
दर्शनासाठी जिल्ह्यातील विविध भागांसह मुबंई, ठाणे पुणे आदी शहरांतील भाविक व पर्यटक मोठ्या प्रमाणावर पालीत दाखल झाले होते. येथील दुकानदार व हॉटेल व्यवसायिकांचा धंदा देखिल तेजीत होता. बल्लाळेश्वर मंदिर परिसरात गावठी भाज्या, फळे, कंदमुळे व रानमेवा घेऊन अनेक महिला विक्रेत्या बसल्या होत्या. देवळात येणारे भाविक आवर्जून ते खरेदी करत होते. त्यामुळे या विक्रेत्यांचा धंदा चांगला झाला.