। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
सलग आलेल्या चार दिवसांच्या सुट्ट्यांमुळे अष्टविनायक तीर्थक्षेत्र बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी गेल्या दोन दिवसांपासून हजारो भाविक पालीत आले होते. सकाळपासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसराला जणूकाही यात्रेचे स्वरूप आले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बल्लाळेश्वर मंदिराला तिरंग्याची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
भाविकांची गर्दी असल्याने येथील दुकानदार व हॉटेल व्यवसायिकांचा धंदा तेजीत होता. मंदिर परिसरात गावठी भाज्या, फळे, कंदमुळे व रानमेवा घेऊन अनेक महिला विक्रेत्या बसल्या होत्या. देवळात येणारे भाविक आवर्जून ते खरेदी करत होते. त्यामुळे या विक्रेत्यांचा धंदा चांगला झाला.
हॉटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, नारळ, हार , फुल व पापड मिरगुंड, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले यांचा व्यवसाय चांगला झाला. मंदिर परिसरात मोठी वर्दळ पहायला मिळत होती. भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.
वाहतूक कोंडी
भाविकांची वाहने व अवजड वाहने यांची मोठ्या प्रमाणात रेलचेल होती. त्यामुळे अरुंद रस्त्यावरून समोरसमोरून वाहने आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाक्या नाक्यावर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच देवस्थानचे सुरक्षा रक्षक देखील देवस्थान परिसरातील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होते.
सलग सुट्ट्या आल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक पालीत दर्शनासाठी आले होते. अनेकांनी चांगली खरेदी देखील केली. त्यामुळे व्यवसाय चांगला झाला.
राहुल मराठे, व्यावसाईक
देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी विशेष खबरदारी घेत उपाययोजना केल्या आहेत. देवस्थानचे दोन भक्त निवास नाममात्र दरात भाविकांसाठी उपलब्ध केले आहेत.शुद्ध थंड पाण्याची व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. रांगेत उभे राहण्यासाठी रेलींग व शेड उभारण्यात आली आहे. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंग देखील आहे.
जितेंद्र गद्रे, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली