| नागोठणे | वार्ताहर |
नागोठण्यातील श्री साई सेवक मित्रमंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेला 13 वा नागोठणे ते शिर्डी पदयात्रा पालखी सोहळा दि. 20 डिसेंबरला शिर्डी येथे साईबाबांच्या दरबारी पोहोचल्यानंतर या पालखीचे नागोठणे नगरीत 22 डिसेंबरला आगमन झाले. पदयात्रेत सहभागी झालेले साईभक्त नागोठणे येथे परतल्याने साई भक्तांकडून बुधवारी, (दि. 25) डिसेंबरला सायंकाळी सात वाजता ग्रामदेवता जोगेश्वरी मातेच्या पटांगणात आयोजित केलेल्या साई भंडार्यात नागोठणे शहरातील शेकडो नागरिकांनी व साईभक्तांनी सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.
या पायी साई पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या साईभक्तांचा, पालखी सोहळ्याला सहकार्य करणार्या अनेक देणगीदार व मान्यवरांचा यावेळी शाल व श्रीफळ देऊन श्री साई सेवक मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला नागोठण्याचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, संतोष नागोठणेकर आदींसह नागरिक व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा साई भंडारा यशस्वी होण्यासाठी श्री साई सेवक मित्रमंडळाचे शंकर भालेकर, मच्छिंद्र साळुंखे, मनोज भोसले, विशाल खंडागळे आदि पदाधिकार्यांसह मंडळाचे सदस्य तसेच पदयात्रेत सहभागी झालेले सर्व साई सेवक यांनी मेहनत घेतली.