आधी धरणाचे पाणी विकले, आता श्रीमंतांचे चोचले पुरविण्यासाठी बोटिंग
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्टा हिरवागार होण्यासाठी दोन गावांचे स्थलांतरण करून पाली भूतीवली हा लघुपाटबंधारे प्रकल्प उभारण्यात आला. या धरणातून आजूबाजूच्या 20 गावातील 1100 हेकटर जमीन ओलिताखाली येणार होती. मात्र, शेतीसाठी पाणी देण्यासाठी कालवे बांधण्यात आले नसल्याने धरणातील पाणी सरकारने एका बिल्डरला विकले आणि आता त्या धरणात श्रीमंतांचे चोचले पुरविण्यासाठी थेट बोटिंग करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, पाली भूतीवली धरण हे सरकारला सोन्याची अंडी देणारी कोंबडी वाटली काय? असा संतप्त सवाल प्रकल्पग्रस्त आणि बाधित शेतकरी यांच्याकडून उपस्थित केला गेला आहे.
पाली भूतीवली धरणातील पाणी धरणाच्या जलाशयात पाईप टाकून ओढले जात असून, पाटबंधारे खाते मूग गिळून गप्प आहे. धरणातील पाणी शेतीसाठी असताना बिल्डरसाठी धरणातील पाणी विकण्यात आले असून, आता त्याच पाली भूतीवली धरणातील डेड वॉटर वर श्रीमंतांचे चोचले पुरविण्यासाठी बोटिंग चे नावाखाली परवाना देण्यात आला आहे.धरणात बोटिंगसाठी तीन संस्थांनी पाटबंधारे विभागाकडे नौका विहार करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यातील एका संस्थेला कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या ठाणे विभागीय कार्यालयाने ही परवानगी 19 डिसेंबर 2024 रोजी दिली आहे. त्यामुळे श्रीमंतांसाठी स्पीड बोटीतून नौकावाहन करण्यासाठी पाली भूतीवली धरण सज्ज झाले आहे. त्या नौका विहाराचा परिणाम भातशेती करण्यासाठी उत्सुक असलेल्या शेतकर्यांना शेतीसाठी पाणी मिळणार नसल्याने शेती आणि तत्सम व्यवसायांना खीळ बसून शेतकर्यांची आर्थिक प्रगतीदेखील खुंटणार आहे.
जलाशयातील माशांना धोका
धरणातील जलाशयात असलेल्या माशांना मोठा धोका निर्माण झाला आहे. धरणातील मासे हे आकाराने खूप मोठे असल्याचे पावसाळ्यात धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर दिसून येते. त्यामुळे एखाद्या स्पीड बोटीला धरणातील मोठ्या माशाने धडक दिल्यास स्पीड बोट पलटी होऊन मोठा अपघात होण्याची शकयता निर्माण झाली आहे. धरणातील माशांना धोका निर्माण झाल्यास पिसाळलेले मासे हायस्पीड बोटींना धडक देऊ शकतात, अशी शक्यता शेतकरी वर्तवित आहेत.
साडे पंधरा लाख अनामत, अडीच लाख भाड्यासाठी सरकार नमले
पाली भूतीवली धरणाचे पाणी दोन लाखांच्या पाणीपट्टीवर वर्षासाठी याआधी विकण्यात आले आहे, त्यानंतर आता धरणाचे मुख्य जलाशयातील पाण्यावर आता नौका विहार केला जाणार आहे. त्यासाठी पाटबंधारे निविदा मंजुरी केलेल्या संस्थेला वर्षाला फक्त दोन लाख 45 हजार 500 रुपये भरावे भाड्यापोटी भरावे लागणार आहेत. तर संबंधित नौका विहाराचा ठेका मिळविण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या विभागीय कार्यलयाने केवळ 15 लाख 58 हजारांची अनामत रक्कम बँक गॅरंटी म्हणून वसूल केली आहे.
पाच वर्षांचा करार
सदर संस्थेला पाली भूतीवली धरणात नौका विहार करण्यासाठी पाच वर्षांचा करार केला आहे. त्या काळात केवळ प्रत्येक वर्षी 15 टक्के वाढ केली जाणार आहे. 2029 मध्ये भाडेपट्टा हा तीन लाख 24 हजार एवढा असणार आहे.
बिल्डरसाठी पाटबंधारेच्या पायघड्या
शासनाने आपल्या पाटबंधारे खात्याची अखत्यारीत असलेल्या धरणातील पाणी एका बिल्डरला विकले आहे. त्या पाण्यावर स्थानिकांनाच अधिकार असताना स्थानिकांना धरणाचे पाणी वाहून जात असलेल्या नाल्यावर विहीर खोदून पाणी उचलून पाणीपुरवठा योजना राबवावी लागते. मात्र, तेथील बिल्डरसाठी पाटबंधारे खात्याने पायघड्या घातल्या असून, धरणाच्या जलाशयात पाईप टाकून पाणी उचलण्याची परवानगी दिल्याने शासनाची वाटचाल कुठे चालली आहे, असा सवाल स्थानिक शेतकरी विचारात आहेत.