बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

। पाली/बेणसे । वार्ताहर ।

अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीतील बल्लाळेश्वराच्या चरणी गणेशोत्सवात हजारो भाविक गणेशभक्त नतमस्तक होताना पहावयास मिळत आहेत. मोठ्या भक्तिभावाने बल्लाळेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गणेशोत्सवात दरवर्षी राज्य व देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्तपाली येथे दर्शन घेऊन मनोभावे पूजन करून आपापल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भक्तगण प्रार्थना करीत असतात. अनेक माता पिता नवस फेडण्यासाठी बल्लाळेश्वर मंदिरात येतात. गणेशोत्सवात सुवर्ण मुकुट, अलंकार, रंगीबेरंगी वस्त्र परिधान केलेली बल्लाळेश्वराची मनमोहक आकर्षक मूर्ती भाविकांच्या मनाला भावणारी व सुखद अनुभव देत होती. ऋषीपंचमीच्या दिवशी बल्लाळेश्वर मंदिरात गोपाळकाळाचा विविध कला कसरती करून दहीहंडी फोडली जाते. मंदिरात आगळावेगळा गोपाळकाळा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भर पावसात दहीहंडी फोडण्याचे हे दुर्मिळ दृश्य नजरेत सामावून घेण्यासाठी देखील गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आरती, घंटानाद, कीर्तन देखील करण्यात आले. जिल्ह्यासह कोकण, राज्य आणि देशात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. आपल्या लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर सर्वत्रच उत्साही , आनंददायी व मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे, गावोगावी खेड्यापाड्यात, ग्रामीण व शहरी भागात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

भाविक, भक्तगणांनी बल्लाळनगरी गजबजून गेलीय. हार, फुले, पेढे, कंदी पेढे, मूर्ती, पूजा साहित्याची दुकाने सजलीत, दुकानदारांचा धंदा ही तेजीत आहे. गणेशोत्सवात रायगड जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, पुणे व राज्यातून पालीत हजारोच्या संख्येत भाविक व त्यांची वाहने दाखल झाली होती. तसेच गणेशोत्सवासाठी गावोगावी आलेले चाकरमानी देखील बल्लाळेश्वर मंदिरात दर्शनासाठी येतात.

देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी आरोचे शुद्ध थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहने पार्क करण्यासाठी मोफत सोय देखील आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही.

जितेंद्र गद्रे, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली
Exit mobile version