संकष्टीला चक्क पावसाला ब्रेक;पालीत भाविकांची गर्दी

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
गेले सहा दिवस धो-धो कोसळणार्‍या वरुणराजाने शनिवारी ब्रेक घेतल्याने संकष्टी चतुर्थीला पालीत गणेश दर्शनासाठी भाविकांची गर्दी पहावयास मिळाली. शनिवार, रविवार सुट्टी असल्याने बल्लाळेश्‍वर मंदिर भक्तगणांनी फुलून निघाले.

दर्शनासाठी रायगड जिल्हा, महाराष्ट्रातील विविध भागांसह मुबंई, ठाणे पुणे आदी शहरांतील भाविक व पर्यटक मोठ्या प्रमाणावर पालीत दाखल झाले होते. गर्दी असल्याने येथील दुकानदार व हॉटेल व्यवसायिकांचा धंदा तेजीत होता. बल्लाळेश्‍वर मंदिर परिसरात गावठी भाज्या, फळे, कंदमुळे व रानमेवा घेऊन अनेक महिला विक्रेत्या बसल्या होत्या. देवळात येणारे भाविक आवर्जून ते खरेदी करत होते. त्यामुळे या विक्रेत्यांचा धंदा चांगला झाला.

जणूकाही यात्रेचे स्वरूप आले होते. भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्‍वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाण्याची व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. रांगेत उभे राहण्यासाठी रेलींग व शेड उभारण्यात आली आहे. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंग देखील आहे. तसेच सुसज्ज स्वच्छता गृह देखील उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही. असे देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष जितेंद्र गद्रे व विश्‍वस्त मंडळाने सांगितले.

वाहतूक कोंडी
अंगारकी व इतर संकष्टीप्रमाणे वाहनांची वर्दळ नसली तरी पालीत दाखल झालेल्या भाविकांच्या गाड्यांमूळे वाहतुकीस अडसर निर्माण झाल्याचे दिसून आले. परंतू पाली पोलीस व बल्लाळेश्‍वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने पाली पोलीस निरीक्षक विश्‍वजित काईनगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक नाक्यावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देवळाच्या शेजारून जाणारी सर्व वाहने भक्तनिवास क्रमांक 1 च्या बाजूने पार्किंगच्या दिशेने वळविण्यात आली होती.

Exit mobile version