व्यावसायिक सुखावले, वाहतुक कोंडीचा प्रश्न जटिल
| पाली/बेणसे । वार्ताहर ।
नववर्षाच्या स्वागतासाठी अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे येथील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचा धंदा तेजीत आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षे मंदी होती मात्र आता गर्दी होत असल्याने व्यावसायिक सुखावले आहेत. पालीत हजारोच्या संख्येत भाविक व त्यांची वाहने दाखल होत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
नाताळपासून सुरू झालेली भाविकांची गर्दी थेट जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राहील. कारण नाताळच्या सुट्ट्या, नवीन वर्षाचे स्वागत, विविध सहली आणि 25 जानेवारीला असलेला माघी गणेशोत्सव यामुळे महिनाभर पालीत भाविकांची प्रचंड गर्दी राहणार आहे असे बल्लाळेश्वर देवस्थानचे उपाध्यक्ष वैभव आपटे यांनी सांगितले.
भाविकांची मोठी गर्दी असल्याने येथील दुकानदार व हॉटेल व्यवसायिक यांचा धंदा देखील तेजीत आहे. परिसरातील दुकाने, हॉटेल व लॉज ग्राहकांनी गजबजले आहेत. येथील हॉटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, नारळ, हार, फुले व पापड मिरगुंड, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले जय्यत तयारीत आहेत. मंदिर परिसरात मोठी वर्दळ पहायला मिळत आहे. बल्लाळेश्वर मंदिर परिसरात फळे, कंदमुळे व रानमेवा घेऊन अनेक विक्रेत्या महिला विक्री करत आहेत. देवळात येणारे भाविक आवर्जून येथून हा रानमेवा खरेदी करतांना दिसतात. त्यामुळे या विक्रेत्यांचा धंदा सुद्धा चांगला होत आहे. भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.
वाहतूक कोंडी
खासगी वाहने, डंपर, अवजड व लक्झरी वाहनांची ये-जा, नियमांचे उल्लंघन करणारे चालक, अरूंद रस्ते व रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वाहने व बांधकामे यांमूळे पालीत सतत वाहतूक कोंडी असते. सुट्टयांच्या काळात तर मोठ्या प्रमाणात पर्यटक व भाविक पालीत दाखल होत आहेत. या वाहनांमुळे पालीतील वाहतुकीवर प्रचंड ताण येवुन वारंवार अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.बल्लाळेश्वर मंदिर परिसरात बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक देखील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तैनात आहेत. मात्र त्यांना सर्वच ठिकाणची कोंडी सोडवणे शक्य होत नाही.
देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. देवस्थानचे दोन भक्त निवास नाममात्र दरात भाविकांसाठी उपलब्ध केले आहेत. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी आरोचे शुद्ध थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मेटल डिटेक्टर लावले आहेत. रांगेत उभे राहण्यासाठी रेलींग, मांडव व शेड उभारण्यात आली आहे. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंग देखील आहे. प्रसादालय खुले आहे. तसेच सुसज्ज स्वच्छता गृह देखिल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणार्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही. – जितेंद्र गद्रे, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आता मोठ्या प्रमाणात भाविक बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येत आहेत. भाविकांची गर्दी असल्याने व्यवसाय देखील चांगला होत आहे. मागील दोन वर्षे कोरोनामुळे ठप्प झालेल्या व्यावसायाला आता गती मिळत आहे. – राहुल मराठे, व्यावसाईक, बल्लाळेश्वर देवस्थान