। चिरनेर । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील चिरनेर येथील श्री महागणपतीच्या दर्शनासाठी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने गुरुवारी (दि.28) पहाटे पासूनच शेकडोंच्या संख्येने आलेल्या भाविकांनी गर्दी केली होती. पहाटे चार वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. महागणपतीची महापूजा संपन्न झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करीत भक्तीमय वातावरणात दर्शन घेतले.
श्री महागणपतीचे देवस्थान अत्यंत पुरातन असून, पेशवेकालीन भव्य मंदिरात श्री महागणपती विराजमान आहेत. हेमाड पंथीय धाटणीतील हे पाषाणी भव्य मंदिर पेशव्यांचे सरदार रामजी महादेव फडके यांनी उभारले. त्यांनीच या मंदिरात तळ्यात सापडलेल्या प्राचीन भव्य गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. या गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते. नवी मुंबई, ठाणे, उरण, पनवेल, पेण, डोंबिवली परिसरातील हजारो गणेश भक्तांनी संकष्टी चतुर्थी निमित्ताने दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी केली होती.
महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी
