| पुणे | प्रतिनिधी |
पुण्यामध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील कुंडेश्वराच्या दर्शनाला जाताना भाविकांच्या वाहनाला अपघात झाला. भाविकांनी भरलेले वाहन दरीत कोसळले. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील कुंडेश्वराच्या दर्शनाला जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवार निमित्ताने हे भाविक कुंडेश्वराच्या दर्शनासाठी जात होते. त्याचवेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला. नागमोडी वळणावर घाट चढताना वाहन रिटर्न आल्याने महिला भाविकांची पिकअप जिप 100 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर 30 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी भाविकांना खासगी रुग्णालय आणि चांडोली ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या अपघातामुळे खळबळ उडाली आहे.







