परदेशी पाहुण्यांविना किनारे ओस

पाणवठे नष्ट झाल्याने उरणमधील पक्ष्यांची संख्या रोडावली? ; पक्षीप्रेमी, अभ्यासकांना फटका


| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यातील नैसर्गिक पाणथळीची ठिकाणे नष्ट होऊ लागल्याने नोव्हेंबर ते एप्रिल, मे या कालावधीत विविध देशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या फ्लेमिंगोसह इतरही जातींच्या पक्ष्यांच्या संख्येतही घट झाली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेत येथील पाणथळ क्षेत्राचे संरक्षण करण्याची मागणी ज्येष्ठ पर्यावरवादी बी. एन. कुमार यांनी केली आहे. पक्षी संख्या कमी झाल्याने उरण परिसरात येणाऱ्या पक्षीप्रेमी व अभ्यासकांनाही याचा फटका बसत आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबईनंतर पक्ष्यांचं स्थान ठरलेली उरणची पक्षीस्थाने ओस पडत आहेत.

उरण हा समुद्र आणि खाडी किनाऱ्यावर वसलेले आहे. त्यामुळे समुद्र आणि खाडी किनारी येणाऱ्या चिखलातील मासे, किडे हे पक्ष्यांचे खाद्य आहेत. यांच्या शोधत हजारो मैलाचा प्रवास करून विविध जातीचे पक्षी उरणच्या किनाऱ्यावरील पाणथळ ठिकाणी येतात. समुद्राच्या भरतीच्या वेळी येणारे पाणी आणि त्यातून आलेले मासे ही या पाणथळ जागांची खासीयत आहे. यासाठी फ्लेमिंगोसारखे हजारो पक्षी येत होते. मात्र, उरणमधील अनेक पाणथळ जागा या मातीच्या भरावाने बुजविल्या जात आहेत. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणांवरील पाणथळीवर येणाऱ्या समुद्राच्या पाण्याला अडथळा निर्माण केला जात आहे. त्यामुळे उरणमधील पाणथळी कोरड्या झाल्या आहेत. परिणामी, ज्या कारणासाठी पक्षी पाणथळीवर येत होते, तेच नष्ट होत असल्याने पक्षी संख्या रोडावली आहे. यानिमित्ताने येथील पक्षाचे निरक्षण व अभ्यास करण्यासाठी देशातील विविध भागातून येणारे पक्षी अभ्यासकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. निसर्गाच्या रक्षणासाठी महत्त्वाच्या असलेल्या पक्ष्यांचे संरक्षण हे ऐरणीवर आले आहे. त्यामुळे येथील विकासाच्या नावाने सुरू असलेली निसर्गाला नष्ट करणाऱ्या कामावर नियंत्रण ठेवण्याची मागणी पर्यावरणप्रेमीनी केली आहे.

पाणथळी आवश्यक
उरणमधील निसर्ग व पर्यावरण याचा सुरू असलेला ऱ्हास थांबविण्यासाठी पाणथळी पुन्हा एकदा जिवंत केल्या पाहिजे, अशी मागणी उरणच्या पक्षीप्रेमींनी केली आहे. त्यामुळे येथील जैवविविधताही टिकून राहील, असे मत पर्यावरण कार्यकर्ता निकेतन ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.

हजारो पक्ष्यांवर उपासमार
समुद्रातून खाडीत मासळी येण्याचे नैसर्गिक मार्ग मातीचा भराव करून बंद करण्यात आले असून, त्यामुळे खाडीतील मासळीचे प्रमाण कमी झाल्याचा मासळी खाद्य असलेल्या हजारो पक्ष्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. दुसरीकडे पक्ष्यांचे आदिवास असलेले पाणथळे ही नष्ट होत आहेत. याचाही परिणाम पक्ष्यांच्या जीवनावर होऊ लागला आहे. खाद्य शोधण्यासाठी पक्ष्यांनी भ्रमंती वाढली आहे.

Exit mobile version