धनंजय चंद्रचूड होणार देशाचे नवे सरन्यायाधीश

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

देशाचे सरन्यायाधीश उदय लळित यांनी मंगळवारी (दि.11) पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे सरन्यायाधीश पदावर आणखी एक मराठी व्यक्ती बसणार आहे. सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांच्या उपस्थितीत लळित यांनी चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस करणारं पत्र केंद्र सरकारला पाठवले आहे.

लळित 8 नोव्हेंबरला सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होत आहेत. केंद्रीय कायदा मंत्रालयाने परंपरेप्रमाणे विद्यमान सरन्यायाधीश लळित यांना पत्र पाठवून त्यांच्या उत्तराधिकार्‍याच्या नावाची शिफारस करण्यास सांगितलं होतं. यानंतर लळीत यांनी प्रक्रियेनुसार, सर्वोच्च न्यायालयात त्यांच्यानंतर सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्तींची सरन्यायाधीश म्हणून शिफारस केली. विशेष म्हणजे चंद्रचूड यांचे वडील यशवंतराव चंद्रचूड हे सुद्धा देशाचे सरन्यायाधीश होते.

धनंजय चंद्रचूड हे सध्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. ते 10 नोव्हेंबर 2024 ला निवृत्त होत आहेत. त्यामुळे आता त्यांना सरन्यायाधीश म्हणून दोन वर्षांचा कालावधी मिळणार आहे.

धनंजय चंद्रचूड यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी कायद्याचं पुढील शिक्षण आणि डॉक्टरेट अमेरिकेतील प्रसिद्ध हार्वर्ड लॉ स्कुलमधून घेतली. चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय दोन्ही ठिकाणी वकिली केली. जून 1998 मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील म्हणून मान्यता मिळाली. 1998 ते 2000 या काळात धनंजय चंद्रचूड यांनी अ‍ॅडिशनल सॉलिसीटर जनरल म्हणून काम केलं. मार्च 2000 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. महाराष्ट्र ज्युडिशीयल अकॅडमचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केलं. 31 ऑक्टोबर 2013 रोजी चंद्रचूड अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. 13 मे 2016 रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली.

Exit mobile version