| पुणे | प्रतिनिधी |
राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाचे नेते तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांचा कारचा अपघात झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरती पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात राजश्री मुंडे किरकोळ जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरून जाताना सोरतापवाडी या ठिकाणी या अपघाताची घटना घडली आहे. राजश्री मुंडे यांची कार आणि ट्रॅव्हल बसची आमने-सामने धडक होऊन हा अपघात झाला आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहनांची वेगाने धडक झाल्यामुळे हा भीषण अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच तातडीने स्थानिक पोलिस आणि आपत्कालीन सेवांनी पोहोचून मदतकार्य सुरू करण्यात आले होते. या अपघातात राजश्री मुंडे किरकोळ जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या भीषण अपघाताचे नेमके कारण अस्पष्ट असून दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.