मत्स्यव्यावसायिकांचा पेझारीतील सभेत निर्धार
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
मत्स्यशेतीकडे वळलेल्या शेतकर्यांच्या पदरी घोर निराशा आली आहे. मत्स्यबीजाच्या वाढत्या किमती, रोगराईने मत्स्यव्यवसाय तोट्यात गेला आहे. यावर चिंतन विचारविनिमय व उपाय करण्यासाठी तलावधारकांची महत्त्वपूर्ण सभा म्हसोबा मंदिर, पेझारी ढोलपाडा येथे नुकतीच पार पडली. यावेळी मत्स्य व्यवसाय तोट्यात येण्यामागची कारणे शोधून उपाय यावर चर्चा करण्यात आली. केवळ शेतकरी नव्हे तर व्यापारी बनुया, असा एकमुखी निर्धार मत्स्य तलावधारकांनी केला.
या सभेत गेली 10 ते 12 वर्षे तलावातील माशांचा दर 200 रुपये प्रतिकिलो होता, तो आता 240 रुपये प्रमाणे करण्याचे एकमताने ठरवण्यात आले आहे. दहा वर्षांपूर्वी कोंडा 6 ते 7 रुपये किलो दरात मिळत होता. आता कोंडा 25 ते 30 रुपये किलो किमतीत मिळत आहे. शेंगदाणा पेंड 25 ते 35 रुपये किलो दरात मिळत होती. आता 50 ते 60 रुपये किलो दरात मिळत आहे. मत्स्य तरंगते खाद्य 10 वर्षांपूर्वी 25 ते 35 रुपये किलोने मिळत होते. त्यासाठी आता 55 ते 65 रुपये दर मोजावा लागत आहे. मत्स्यबीजाची किंमत वाढली, रोगराईचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मत्स्यशेती तोट्यात जाऊ लागली आहे. भातशेती परवडत नाही म्हणून मत्स्यशेतीकडे वळलेल्या शेतकर्यांच्या पदरी निराशा येऊ लागली आहे.
अलिबाग तालुक्यातील शेत तलावात तयार होणारा मासा हा अतिशय रुचकर असून, त्यातील तिलापिया जातीच्या माशात प्रोटीनचे प्रमाण जास्त असून, ओमेगा-3 हे फॅटी अॅसिड औषधी गुण असलेला हा मासा आहे. तालुक्यातील अनेक खाड्या आहेत, ज्या खाडीत खारे पाणी येते आणि त्याच परिसरात हजारो शेततलाव आहेत. या तलावातील पाणी हे निम खारे असल्यामुळे या तलावात वाढणारा कोणताही मासा अतिशय रुचकर लागत आहे. त्यामुळे अनेक पर्यटकांना या माशाची भुरळ पडू लागली असून, या माशांवर ताव मारण्यासाठी मुंबई, पुणे व इतर शहरांतून अनेक खवय्ये हे अलिबागला येत असतात. मस्त्य पालनाविषयी मार्गदर्शन हवे असल्यास प्रवीण परशुराम म्हात्रे, धामणपाडा -अंबेवाडी 9270150076 यांच्याशी संपर्क साधा, असे यावेळी सांगण्यात आले.