| रोहा | प्रतिनिधी |
रोहे शहरातील धनगरआळी परिसरात पाणी टंचाई जाणवत असल्याने संतप्त लाडक्या बहिणींनी नगर पालिकेवर धडक मोर्चा काढून नगर पालिकेला लेखी निवेदन दिले. ऐन सणासुदीत परिसरात पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांत विशेषतः महिला वर्गात संतापाचे वातावरण पसरला आहे. दरम्यान आपल्या भागातील महिलांचे पाण्या वाचून हाल होत असल्याने या पाणी समास्यावर मात करण्यासाठी लाडक्या बहिनींनी मोर्चा काढला होता.
धनगर आळी भागातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून अनियमित पाणी व कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. पाण्याच्या वेळा देखील निश्चित नाहीत. तसेच अपुऱ्या पुरवठ्यामुळे नागरिकांचे आपापसात भांडण होते. पाणी आल्यानंतर ते अवघे दहा ते पंधरा मिनिटे असते. त्यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त असून, महिलांनी सोमवारी नगरपालिका कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी माजी नगरसेविका सुमित्रा बांदल, लीला बांदल, अश्विनी काफरे, कुसुम बांदल, सुनीता वखारदार, पुष्पा वखारदार, संगीता जाधव, आशा वखारदार, रंजना वखारदार, मंजुळा बांदल, अक्षता शिंदे, आशा काफरे, अश्विनी साळवी, अंजु घरत, संगीता भोसले, वैशाली बांदल, सुरेश बांदल, रवी वखारदार व महिला भगिनी उपस्थित होत्या.
ग्रामस्थांकडून पाणी समस्या बद्दल निवेदन प्राप्त झाले आहे. या भागात नक्की पाणी कमी दाबाने येतंय का हे बघितले जाईल आणि त्यानंतर तातडीने योग्य उपाययोजना केली जाईल.
अजयकुमार शिंदे
मुख्याधिकारी रोहा अष्टमी नगर पालिका
