दै.कृषीवलच्या बातमीनंतर पालिकेने उपलब्ध करुन दिली सुविधा
। पनवेल ग्रामीण । वार्ताहर ।
वाढत्या उष्णतेमुळे पाणी पातळी घटल्याने पालिकेत समाविष्ठ आणि स्मार्ट व्हिलेज म्हणून घोषित धानसर गावातील महिलांच्या डोक्यावर हंडा या मथळ्याखाली दै. कृषीवलच्या 20 एप्रिलच्या अंकात छापून आलेल्या वृत्ताची दखल घेत पालिका प्रशासनाच्यावतीने पाणीसाठा करण्यासाठी अतिरिक्त टाकीचे काम करण्यात आले असून, टँकरद्वारे आलेले पाणी टाकीत साठवून आरो सिस्टीमच्या माध्यमातून पाण्यावर प्रक्रिया करुन शुद्ध करण्यात आलेल्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना करण्यात येणार आहे.
धानसर गावात नळपाणी योजना उपलब्ध नसल्याने बोअरवेलचे पाणी टाकीत साठवून आरो सिस्टीमद्वारे पाणी शुद्ध करण्यात येते. शुद्ध झालेले पाणी नळाच्या माध्यमातून गावाकर्यांना पुरवण्यात येते.
दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालवत असल्याने बोअरवेलद्वारे येणार्या पाण्यात घट होत असल्याने नागरिकांना भीषण पाणी टंचाई जाणवते. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागल्याने दै. कृषीवलने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते.
नागरिकांचा टँकरचे पाणी पिण्याला विरोध
पाणीटंचाई जाणवत असल्याने पालिकेच्या माध्यमातून गावाला टँकरद्वारे अतिरिक्त पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, टँकरद्वारे पुरवण्यात येणारे पाणी अशुद्ध असल्याचे सांगत ग्रामस्थांनी टँकरचे पाणी पिण्याला विरोध दर्शवल्याने अखेर टँकरचे पाणी टाकीत साठवून त्यावर आरो सिस्टीममध्ये प्रक्रिया करुन पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.







