चांगल्या आरोग्यासाठी मंडळाची घेणार मदत

गणेशात्सवात साथरोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धन्वंतरी आरोग्य अभियान

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

गणेशोत्सवामध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी होणार आहे. एसटी स्थानकापासून बाजारपेठ व अन्य ठिकाणी नागरिकांची वर्दळ राहणार आहे. भक्तांच्या चांगल्या आरोग्यासाठी गणेशात्सवात साथरोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने धन्वंतरी आरोग्य अभियान राबविले जाणार आहे. ग्रामपंचायत स्तरापासून जिल्हा स्तरावर आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका, आशासेविका यांच्यामार्फत साथीच्या रोगांची लक्षणे, त्यावरील उपचार, खबरदारीच्या उपाययोजना याबबात व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. गणेश मंडळांकडूनदेखील ध्वनिक्षेपकावर साथरोगांबाबत माहिती दिली जाणार आहे. तसेच सोशल मीडियाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.

पावसाळी वातावरण, ठिकठिकाणी साचलेले पाणी, अस्वच्छता, डासांची पैदास होण्यास पोषक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, अतिसार, कावीळ, टायफॉईड, लेप्टोस्पायरोसिस यासारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव पसरण्याचा धोका आहे. गणेशोत्सवाचे आगमन येत्या 14 सप्टेंबरपासून घरोघरी होणार आहे.दीड दिवसांपासून पाच, सात ते दहा दिवसांच्या गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यामुळे या काळात रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने चाकरमानी, नागरिकांची ये-जा सुरू राहणार आहे. उत्सवाच्या काळातही नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे व तातडीने उपचार मिळावेत यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने धन्वंतरी आरोग्य अभियान राबविण्यात येणार आहे.

मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांमध्ये विशेष आरोग्य पथक तैनात ठेवण्यात येणार आहे. या पथकाद्वारे प्राथमिक उपचार करण्यात येणार आहेत. एसटी डेपो, बाजारपेठा, गणेश मंडळ परिसर अशा परिसरात स्वच्छतेच्या संदर्भात पाहणी, गर्दीच्या ठिकाणी औषध फवारणी, डेंग्यू व मलेरिया निदानासाठी आवश्यक तपासणी किट उपलब्ध करून योग्य ती खबरदारी घेण्यात येणार आहे.

गणेश मंडप परिसर व सार्वजिनक स्वच्छता: सर्व गणेशात्सव मंडळांना त्यांच्या मंडप परिसरात पाणी साचू न देणे, कचऱ्याची नियमितपणे योग्य ती विल्हेवाट लावणे, स्वच्छता राखणे, पिण्याच्या पाण्याची शुद्धता राखणे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच संबंधित ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिकांच्या सहाकार्याने स्वच्छता राखणे, पिण्याच्या पाण्याची तपासणी करून घेण्यासह मंडपांमध्ये जनजागृतीपर फलक लावले जाणार आहेत.

रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी उत्साहाने व आरोग्यपूर्ण गणेशोत्सव साजरा करावा, यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने दक्षता घेण्यात येत आहे. सर्व ग्रामीण, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालयात सर्व औषध साठा तसेच वैद्यकीय टीम सज्ज असणार आहे. गणेश भक्तांनी व गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव काळात मार्गदर्शक सूचनांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी केले आहे.

Exit mobile version