धैर्यशील पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश; कार्यकर्त्यांमध्ये असंतोष
। अलिबाग । प्रतिनिधी ।
एरव्ही शेतकर्यांसाठी, कष्टकर्यांसाठी आवाज उठविणारे पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील शेतकर्यांच्या, कष्टकर्यांच्या, सर्वसामान्यांच्या जीवावर उठणार्या पक्षात गेले. कित्येक दिवसांच्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला. मात्र, त्यांनी थोडा धीर धरला असता तर कदाचित पेणच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली असती. त्यांनी घाईघाईत घेतलेल्या निर्णयामुळे जनतेमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.
सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत धैर्यशील पाटील यांचा पेणमधून पराभव झाला होता. शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मोहन पाटील यांचे सुपुत्र असणार्या धैर्यशील पाटील यांचे धैर्य एका पराभवाने कसे काय कमी झाले? असा प्रश्न निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. कारण, अखेरच्या श्वासापर्यंत मोहन पाटील यांनी शेकापचा लालबावटा मोठ्या डौलाने खांद्यावर घेत डाव्या, पुरोगामी विचाराची चळवळ पेणमध्ये जिवंत ठेवली. मोहन पाटील यांच्या राजकीय आयुष्यात अनेक जय, पराजय आले; पण त्यांनी कधीही न डगमगता पक्षांतर केले नाही. उलट पराभवातूनही ते फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उंच भरारी घेत पुन्हा लोकनेते झाले. तसे धैर्यशील पाटील यांनी करायला हवे होते, अशी खंतही पेणमधील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावरुनच एका विचाराचा वारसा आयुष्यभर जोपासणार्या दादांनी असा अचानक भाजपमध्ये जाण्याचा घेतलेला निर्णय निश्चितच त्यांच्यावर प्रेम करणार्या निष्ठावंतांना क्लेशदायक असाच ठरणारा आहे.
आता ज्या पेणमधून धैर्यशील पाटील शेकापमुळे दोन वेळा आमदार झाले, त्याच मतदारसंघातील विद्यमान आ. रवीशेठ पाटील हेसुद्धा असेच आयात केलेले भाजपचे नेते आहेत. कारण, रवी पाटील यांची राजकीय कारकीर्द काँग्रेसमध्येच झाली. काँग्रेसमुळेच ते विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात मंत्री झालेले होते. सन 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याच रवी पाटील यांना पराभूत करुन धैर्यशील पाटील हे शेकापचे आमदार म्हणून विधानसभेत मोठ्या अभिमानाने गेले होते. आता त्याच रवी पाटील यांच्याशी त्यांना मिळते-जुळते करुन घ्यावे लागणार आहे. केवळ सत्तेसाठी कट्टर विरोधकाच्या खांद्याला खांदा लावून काम करावं लागणार असेल, तर हे दुःखदायक असल्याचेही मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. या पक्षप्रवेशाने अनेक शेतकरी, कष्टकर्यांच्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं आहे. आज त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं धैर्यशील पाटील यांना शक्य होईल की नाही हे, येणारा काळच ठरवेल.
शेकापने भरभरुन दिलं
भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ताकदीने आपण शेकापमध्ये काम केलं, त्याच पद्धतीने आपण इथेही काम करू. शेकापमध्ये काही कमी मिळालं म्हणून नाही, तिथेही आम्हाला भरभरून मिळालं. काही कमी पडले म्हणून हा निर्णय घेतला नाही, असे बोलून धैर्यशील पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
भाजप, निष्ठावंतांचा की आयात नेत्यांचा?
राज्यातील आणि केंद्रातील सत्तेचा पुरेपूर वापर करीत भाजपने आपला विस्तार निश्चित वाढविला खरा. पण, तो वाढविताना अन्य पक्षातील जनाधार असलेल्या नेतेमंडळींना आपल्या प्रवाहात विविध कारणांनी ओढावून घेत पक्षाशी निष्ठावंत असलेल्यांवर अन्याय निश्चित केला, असेच म्हणावे लागेल. कारण, गेल्या दहा वर्षांत रायगडातील भाजपमध्ये जे-जे प्रस्थापित नेते दाखल झालेले आहेत, ते आयात केलेले नेते आहेत, हे कुणीही नाकारु शकत नाही. वास्तविक, अशा आयात नेत्यांमुळे पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या नेते, कार्यकर्त्यांवर अन्याय होतो हे सर्वश्रुत आहे. ज्या नेत्यांशी, पक्षाशी स्थानिक पातळीवर दोन हात करावे लागले, अशाच आयात केलेल्या नेत्यांशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांशी मिळते-जुळते करुन घेणे आता स्थानिक भाजप नेते, कार्यकर्त्यांना भाग पडणार आहे. पेणप्रमाणेच पनवेलमध्येही भाजपने माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या परिवाराला भाजपमध्ये घेत संघटना मजबूत केली. ठाकूर परिवाराचा प्रवासदेखील शेकाप, काँग्रेसमधून भाजप असाच आहे.