आशा स्वयंसेविकांचे धरणे आंदोलन

| अलिबाग | प्रतिनिधी |

आशा स्वयंसेविकांनी गुरुवारी अलिबागमधील जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. राष्ट्रीय मुलनिवासी बहूजन कर्मचारी संघाच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात मानधन नको, पगार हवे, सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

गेल्या अनेक वर्षापासून सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. निवेदन, देऊन सरकारच्या ही बाब लक्षात आणून देण्यात आली आहे. मात्र अद्यापर्यंत सरकारकडून मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही. त्यामुळे पनवेल, कर्जत, खालापूर, तळा या चार तालुक्यांतील आशा स्वयंसेविकांनी एकत्र येऊन अलिबागमधील जिल्हा परिषद कार्यालयावर समोर गुरुवारी धरणे आंदोलन सुरु केले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी आशा स्वयंसेविकांच्या समस्यांबाबत तातडीची बैठक घ्यावी. सविस्तर चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी भूमिका घेतली होती. त्यांच्या कार्यालयासमोर वेगवेगळ्या घोषणा देत सरकार विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.

अखेर प्रशासनाला शिष्टमंडळासमवेत बैठक घेण्यास आंदोलनकर्त्यांनी भाग पाडले. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर राज्य शासन स्तरावरील प्रश्न आहे. तुमचे म्हणणे वरिष्ठ कार्यालयाला कळवू, असे सांगून त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. दरम्यान, मानधन नको पगार हवे, सरकारी कर्मचाऱ्यांचा आशा स्वयंसेविकांना दर्जा द्या, ऑनलाईन कामे लादू नका, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची कामे लावू नका, माता, बालमृत्यूसाठी जबाबदार धरू नका, नियमानुसार पगारी सुट्ट्या द्या, सन्मानपुर्वक वागणूक द्या, अशा अनेक मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

Exit mobile version