सुधागड तलाठी संघातर्फे धरणे आंदोलन

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
ई महाभूमी प्रकल्प राज्य समन्वय अधिकारी रामदास जगताप यांनी तलाठी संवर्गा संदर्भात असंविधानिक शब्द वापरल्यामुळे राज्यात तलाठी वर्गात संताप उसळला आहे. राज्यभरात होत असलेल्या या आंदोलनात रायगड जिल्हा तलाठी संघ व सुधागड तालुका तलाठी संघाने सहभाग दर्शविला. पाली तहसिल कार्यालयासमोर सोमवारी (दि.11) सुधागड तालुका तलाठी संघाने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
राज्यात नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती उद्भवलेली आहे. महाराष्ट्रात युद्ध पातळीवर शेती नुकसानीचे पंचनाम्याची कामे सुरू आहेत. ई-पीक पहाणी व मोफत सातबारा वाटप ही महत्वाची कामे करीत आहेत. असा संदेश महाराष्ट्र राज्य संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव दूवळ आप्पा यांनी सर्व तलाठी बांधवांना दिलेला होता. त्या संदर्भात पुणे जिल्हाध्यक्ष तेलंगे यांनी वरील मॅसेज एका ग्रुपमध्ये शेअर केला. सदर संदेशाबाबत रामदास जगताप यांनी मूर्खासारखे असे मॅसेज सोशल मीडियावर का टाकला अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे तलाठी वर्गात नाराजी व संताप दिसून येतोय. याचाच भाग म्हणून तलाठी संघाने सदर वक्तव्याचा निषेध दर्शविला.
यावेळी सुधागड तालुका संघाचे अध्यक्ष अनंता वारगुडा, सचिव दामोदर शिद, उपाध्यक्ष विमल घोळवे, गोविंद हरणे, डी. के. सरनाईक, प्रवीण भोईर आदींसह पदाधिकारी व तलाठी उपस्थित होते.

Exit mobile version