गणेशोत्सवासाठी ढोलकी विक्रेते दाखल

। तळा । वार्ताहर ।

कोकणात गणपतीच्या सणाला अत्यंत महत्व आहे. या गणेशोत्सवाच्या काही दिवस अगोदर तळा शहरातून खांद्याला ढोलक्या अडकवून त्या विक्रीसाठी फिरणारे कारागीर दिसू लागतात. गाव शहरातून ढोलकी वाजवत फिरणार्‍या या कारागिरांच्या ढोलकीचा आवाज कानावर पडला की आपोआप गणेशोत्सवाची चाहूल लागते. गणपतीच्या आरती वेळी बहुतेक घरातून ढोलकीचा सूर ऐकायला मिळतो. तो कानावर पडला की आरतीलाही रंगत भरली जाते. गणपती सणासाठी मोठी आरस, पक्वान्ने, वाद्ये बाजारात विक्रीसाठी येत असतात. याचप्रमाणे ढोलकी विक्रीलाही तळ्यामध्ये सुरुवात झाली आहे. मोकळ खोड, शेळीचे चामडे, चाव्या, पॉलिश, शाई आणि दोरी व वादी आदी साहित्य वापरून ढोलकीची बांधणी केली जाते.ढोलकी विक्रेते दहा ते पंधरा ढोलक्या खांद्याला अडकवून तळा बाजारपेठेत विकताना दिसत आहेत. या ढोलक्या 250 रुपयांपासून 700 रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. गणेशोत्सवात ढोलकीचा उपयोग आरती सोबतच भजनासाठी तसेच पारंपरिक गाणी वाजविण्यासाठीही होतो. त्यामुळे गणेशोत्सवात ढोलकीला मोठी मागणी असते.

Exit mobile version