तरुणाईची थरारक खेळाला पसंती
पाली/बेणसे | प्रतिनिधी |
धुव्वाधार कोसळणारा उत्तुंग धबधबा, आसंमतभर तुषार आणि कानोकानी घुमनारी गाज कधी मनमोहक, तर कधी अक्राळविक्राळ आणि त्यात स्वतःला पाठमोरं झोकून देत त्या जलधारा, ते तुषार, काळ्या किंवा निळ्या आभाळासह तो सारा नजरा अंगावर घेत तर्जनी एवढ्या दोरखंडावर कसरत करत झुलणारा साहसवीर. वॉटरफॉल रॅपलिंगमधला हा थरार अनुभवण्यासाठी लोक पसंती देताना दिसत आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुंबई, पुण्यातील तरुणाईचा सहभाग व उत्साह वाखाणण्याजोगा असाच पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यात भिरा येथील देवकुंड, पनवेलजवळील दोधानी धबधबा, अलिबाग तालुक्यातील सागरगड येथील धबधबा, कर्जत तालुक्यातील डिकसळ व भिवपुरी येथील बेकरे या धबधब्यांवर वॉटरफॉल रॅपलिंगसाठी गर्दी असते. विविध संस्था येथे वॉटरफॉल रॅपलिंगचे आयोजन करतात. त्यामुळे स्थानिकांना चांगला रोजगारदेखील उपलब्ध होत आहे. सुधागड तालुक्यातील आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक व मॅकविला द जंगल यार्डचे संस्थापक मॅकमोहन हुले यांनी सांगितले, की पनवेल येथील दोधानी धबधब्यावर प्रत्येक विकेंडला रॅपलिंगचे आयोजन सुरू करण्यात येत आहे. मागील आठवड्यात एस.एन.डी.टी कॉलेजच्या 40 विद्यार्थिनींनी वॉटरफॉल रॅपलिंगचा थरार व मस्ती अनुभवली आहे.
रॅपेलिंग हा एक गिर्यारोहणाचाच प्रकार असून, उत्कृष्ट साहसी खेळ आहे. कारण, यात कोणीही करू शकणार्या चढाई व उतरणे या क्रियेचा समावेश आहे. यात फार कमी वेळात लोक खाली उतरू शकतात. वॉटरफॉल रॅपलिंगमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. शिवाय, थरार व मजादेखील सुरक्षितपणे अनुभवता येते. त्यामुळे दिवसेंदिवस रॅपलिंगला अधिक पसंती मिळताना दिसत आहे. जिल्ह्यात यासाठी उत्कृष्ट व सुरक्षित ठिकाणेदेखील आहेत. परिणामी, पुणे, मुंबई आदी शहरातील तरुण व तरुणी तसेच लहानगे मोठ्या प्रमाणात रॅपलिंगचा आनंद व थरार अनुभवण्यासाठी येथे येताना दिसत आहेत.
…तरच नाद करा
मुळात, रॅपलिंग हाच तंत्र व कौशल्याचा मिलाफ असलेला सुंदर साहसी प्रकार आहे. वॉटरफॉल रॅपलिंग ही त्याची अधिक थरारक, अधिक कौशल्य व शारीरिक आणि मानसिक स्ट्रेन्थ पणाला लावणारी पायरी आहे. मान्यताप्राप्त, प्रमाणित, शासन नोंदणीकृत व अनुभवी संस्था वा प्रशिक्षकांकडून सुरुवातीला रॅपलिंगचे धडे गिरवावेत. सुरक्षेची योग्य काळजी घेऊन योग्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वॉटरफॉल रॅपलिंगचा नाद करावा.
खेळ निसर्गाशी
कोसळत्या धबधब्यात उतरणं हे नैसर्गिक नाही. तो निसर्गाशी खेळ करणं आहे. रॅपलिंगचा व्यावहारिक आणि स्पर्धात्मक दोन्ही उपयोग व फायदा आहे. व्यावहारिकतेमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती (सेल्फ रेस्क्यू) किंवा इतर व्यक्तींना उंचीवरून सुरक्षितपणे खाली उतरण्याची (रेस्क्यू) आवश्यकता असते, त्यावेळी रॅपलिंगचा खूप फायदा होतो. तसेच स्वस्पर्धात्मक राहणे ही माणसाला तितकेच नवीन आव्हाने देतात. अनुभवसुद्धा तितकाच दांडगा होतो.
अनेक लोक पावसाळ्यात वॉटरफॉल रॅपलिंग या इव्हेंटसाठी जिल्ह्यात येत असतात. त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम आम्ही करीत आहोत. मॅक विला द जंगल यार्ड ही टीम मागील आठ वर्षे वॉटरफॉल रॅपलिंग, कॅम्पिंग-एडवेंचर, ट्रेकिंग, क्लाइंबिंग, सर्च अँड रेस्क्यू, स्कूल इव्हेंट, कॉर्पोरेट इव्हेंट अशा क्षेत्रात काम करीत आहे. जिल्ह्यात यासाठी अधिक वाव व पसंती आहे.
मॅकमोहन हुले, प्रशिक्षक व संस्थापक, मॅक विला द जंगल यार्ड
नुकताच पनवेल येथील दोधानी धबधब्यावर रॅपलिंगचा अनुभव घेतला. हा माझ्या आयुष्यातील आजवरचा सर्वोत्तम अनुभव होता. आम्हाला येथील स्वयंसेवकांनी खूप चांगले मार्गदर्शन केले. यापुढे इतरही जणांना सोबत घेऊन पुन्हा रॅपलिंगसाठी यायचे आहे.
– वंशिका बोराटे, विद्यार्थिनी
मॅकविला द जंगल यार्ड वॉटरफॉल रॅपलिंग इव्हेंट हा माझ्या आयुष्यातील सर्वात थरारक, आकर्षक, उत्साही, जबरदस्त व मंत्रमुग्ध करणारा अनुभव होता. सर्व प्रशिक्षक, विशेषतः मॅकमोहन हे प्रेरणादायी आणि सहकार्य करणारे होते. त्यांनी माझ्या गटातील कोणत्याही सदस्यांना कधीही भीती वाटू दिली नाही. मी आणि माझ्या गटातील सदस्यांना रॅपलिंगची वारंवार पुनरावृत्ती करायची आहे.
प्रतिमा तिवारी, सहल आयोजक, एसएनडीटी महाविद्याल