दोन बोटींसह तिघेजण ताब्यात
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
बेकायदेशीररित्या डिझेलची तस्करी करणाऱ्या दोन बोटींवर मांडवा सागरी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत दोन बोटींसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.29) सायंकाळी घडली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मांडवा बंदराजवळ दोन बोटींद्वारे डिझेलची तस्करी होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे सोमवारी (दि.29) दुपारी पथकाने छापा टाकला. या छाप्यात सुमारे 20 हजार लिटर डिझेलचा साठा आढळून आला. या गुन्ह्यातील तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, दोन बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. जून पासून बोटींना समुद्रात बंदी आहे, तरीदेखील खुलेआमपणे बोटींद्वारे डिझेल तस्करी केली जात आहे. या घटनेने शासनाचे नियम धाब्यावर बसवून डिझेल तस्करीचा गोरखधंदा सक्रीय असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी पदभार स्विकारल्यानंतर डिझेल तस्करी करणाऱ्यांना दणका देण्यात आला होता. मात्र, पुन्हा काही मंडळी हा धंदा छुप्या पद्धतीने सागरी मार्गाने करीत आहेत. सागरी मार्गाने हा गोरखधंदा चालविला जात असताना कोस्टल विभाग काय करतय? असा सवाल जनमानसातून उमटला जात आहे.
