| अलिबाग | प्रतिनिधी |
नशा मुक्त युवक फॉर विकसित भारत या अभियानांतर्गत मेरा स्वास्थ्य, मेरा गर्व – माझे आरोग्य, माझा अभिमान या संकल्पनेखाली जे. एस. एम. महाविद्यालय, अलिबाग येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी व्यसनाधीनता व व्यसनाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तसेच पोषण आहाराचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील होत्या. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून युवकांचे आरोग्य, व्यसनमुक्त जीवनशैली आणि संतुलित आहारांचे महत्त्व अधोरेखित केले. निरोगी युवक हे सक्षम समाज आणि विकसित राष्ट्राच्या निर्मितीचे महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मनोविकारतज्ज्ञ डॉ. अनिल डोंगरे, अलिबाग यांनी व्यसनाधीनता व व्यसनाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. व्यसनाची सुरुवात कशी होते, त्याचे मानसिक व शारीरिक आरोग्यावर होणारे परिणाम, व्यसनामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक व कौटुंबिक समस्या तसेच व्यसनापासून दूर राहण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक सजगता याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. युवकांनी व्यसनांना नकार देऊन आरोग्यदायी आणि सकारात्मक जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.
कल्पना गाडे यांनी पोषण आहाराचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनातील संतुलित आहार, पौष्टिक अन्नपदार्थ, योग्य आहाराच्या सवयी आणि निरोगी जीवनशैली याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शरीराच्या आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यासाठीही योग्य पोषण आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमादरम्यान व्यसनमुक्तीची शपथ व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रमुख श्रीमती सुप्रिया जेधे यांनी विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहण्याचा तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये आणि समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्याचा संकल्प केला. कार्यक्रमासाठी जनता शिक्षण मंडळ, अलिबागचे अध्यक्ष डॉ. गौतम पाटील यांनी शुभेच्छा संदेश दिला. युवकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनी आठवले यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. प्रविण गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रविण गायकवाड, प्रा. अश्विनी आठवले आणि डॉ. पंकज घरत यांनी केले.






