पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
| रत्नागिरी | प्रतिनिधी |
रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै बंदरामधून दापोली पोलिसांनी एका मासेमारी नौकेतून अवैधरित्या विक्री करण्यासाठी आणलेले सुमारे 30 हजार लीटर डिझेलसदृश्य द्रवपदार्थ या नौकेसह जप्त केले आहे. या मुद्देमालाची किंमत सुमारे 47 लाख 62 हजार 500 रुपये असल्याची माहिती दापोली पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी संशयित पाच जणांविरोधात विनापरवाना गुन्हा दाखल केला आहे.
संशयित वामन पोशिराम रघुवीर, (37) रा. हर्णै, हातीन केसरीनाथ कोळी (34) व दर्शन अनंत कोळी, (35) दोन्ही रा. बोडणी, रेवस, ता. अलिबाग, संदीपकुमार मिठाईलाल मिसाद, (32) व शिव्य प्रमोद मिसाद (19) रा. झापराबाद, जोनपूर (उत्तरप्रदेश) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्णै बंदर येथे एका मासेमारी नौकेतून बेकायदा विक्री करण्यासाठी डिझेलसदृश्य द्रवपदार्थ आणला असल्याची माहिती दापोली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दि. 15 रोजी सायंकाळी 5 वाजता हर्णै बंदर येथे पोलिसांनी पथकासह धाव घेतली. तेथे त्यांना ‘सुफी’ नावाची एमएच 7 एमएमएम 288 हा क्रमांक असलेली एक मासेमारी नौका आढळून आली. या नौकेची तपासणी केली असता नौकेच्या 14 खणांमध्ये सुमारे 30 हजार लीटर डिझेलसदृश्य द्रवपदार्थ आढळून आले. याच नौकेवर हा द्रवपदार्थ काढण्यासाठी एक सक्शन पंपही त्यांना आढळून आला.
संशयितांविरोधात विनापरवाना डिझेलसारख्या जीवनावश्यक व ज्वालाग्राही पदार्थाची कोणतीही योग्य ती खबरदारी न घेता मानवी जीवितास धोका उत्पन्न होईल, अशा रीतीने हाताळणी, साठवणूक व वाहतूक केल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही तक्रार उपनिरीक्षक दत्ता पवार यांनी दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली. या कारवाईत पोलीस उपअधीक्षक आवटी, पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, उपनिरीक्षक राजकुमार यादव, दत्ता पवार, हेड काँ. सडकर, पंकज पवार, विकास पवार, सुहास पाटील, सुरज मोरे सहभागी झाले होते. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे करत आहेत. दापोली पोलिसांच्या या कारवाईमुळे हर्णै परिसरात खळबळ उडाली आहे.