टेम्पो अडवून डिझेलची चोरी

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल-सायन महामार्गावर कामोठे टोलनाक्याच्या बाजूला जबरदस्तीने टेम्पो अडवून टेम्पोमधील बोल्ट आणि डिझेलची चोरी करून चालकाला मारहाण केल्याची घटना नुकताच घडली आहे. या प्रकरणी तीन अज्ञात व्यक्तींविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिखली, पुणे येथील सुनील रेणके हे चिखली येथून टेम्पोत गोणींमध्ये बोल्ट घेऊन कामोठे टोलनाक्याजवळ पहाटेच्या सुमारास आले असता, त्यांच्या टेम्पोच्या काचेवर आणि दरवाज्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून गाडीच्या काचा फोडल्या. त्यानंतर त्यांनी सुनील यांना मारहाण केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर, त्यांनी टेम्पोच्या डिझेल टाकीतून डिझेल काढून घेतले. तसेच, त्यांनी टेम्पोत ठेवलेल्या बोल्टच्या गोणी चोरून नेल्या. त्यानंतर भयभीत झालेल्या सुनील यांनी कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तीन अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरू केला आहे. तक्रारदार सुनील यांनी दिलेल्या तक्रारीत हे तिघे दोन महागड्या कारमधून आले होते. तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीवरून कमोठे पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्याची माहिती कामोठे पोलिसांनी दिली आहे.

Exit mobile version