। पनवेल । वार्ताहर ।
महामार्गाच्या कडेला थांबलेल्या वाहनचालकांना चाकूचा धाक दाखवून जबरीने डिझेल चोरी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना कळंबोली पोलिसांनी अटक केली आहे. नवी मुंबई येथील आकाश चव्हाण (29), आणि जितू चावला (36), अशी या दोघांची नावे आहेत. त्यांनी कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा केला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानुसार तपास पथकाने मोठ्या कुशलतेने तपास करत आकाश व जितू या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 175 लिटर डिझेल, 5 लाख रुपये किमतीची कार, एक चाकू, कारसाठी वापरत असलेली बनावट नंबर प्लेट व डिझेल चोरीसाठी वापरले जाणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले. हे चोरटे ऑनलाइन अॅपद्वारे वाहन भाडेतत्त्वावर घेऊन त्यावर बोगस नंबर प्लेट वापरून डिझेल चोरीचे गुन्हे करत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच त्यांनी यापूर्वी पनवेल तालुका, कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीत व नवी मुंबई परिसरात असे गुन्हे केल्याचे समोर आले आहे.







