। अलिबाग । प्रतिनिधी ।
कर्जत मतदारसंघामध्ये एकूण मतदार 3,18,742 असून, त्यापैकी 2,40,010 जणांनी मतदान केले. मात्र, मतपेटीत 2,39,999 इतकीत मते पडली आहेत. उर्वरित 11 मते गेली कुठे, असा सवालही उपस्थित होत आहे? उरण मतदारसंघामध्ये 3,42,101 मतदार असून, पैकी 2,62,747 जणांनी प्रत्यक्षात मतदान केल्याचे समजते. परंतु, प्रत्यक्षात उमेदवारांना 2,63,548 मते मिळाल्याचे आकडेवारीतून दिसून येते. त्यामुळे 801 वाढीव मते असून, ही मते नेमकी आली कुठून, ही आकडेवारी बुचकळ्यात टाकणारी आहे. श्रीवर्धन मतदारसंघामधील मतदारांची संख्या 2,65,286 इतकी असून, त्यापैकी 1,62,794 मतदारांनी प्रत्यक्षात मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविल्याची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. असे असताना प्रत्यक्षात मोजणीदरम्यान 1,63,939 मतदारांनी मतदान केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे 1145 इतका मतांचा आकडवा वाढल्याचे आकडेवारी सांगते. मग, ही वाढीव मते कुठून आली, याबाबत निवडणूक विभाग बोलायला तयार नाही.
महाड मतदारसंघात 2,96,388 इतके मतदार असून, त्यापैकी 2,12,016 इतक्या मतदारांनी प्रत्यक्षात मतदान केले आहे. मात्र, उमेदवारांना मिळालेल्या मतांची बेरीज 2,13,325 इतकी असल्याचे दिसून येते. त्यामुळे 1309 इतकी वाढीव मते या मतदारसंघात आढळून आली आहेत.
पेण मतदारसंघामध्ये एकूण 3,07,979 मतदारांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 2,24,892 मतदारांनी मतदानाच्या दिवशी मतदान केल्याचे समजते. त्यानुसार 2,26,527 इतकी मते उमेदवारांना मिळाली असून, 1635 इतकी मते अधिकची आहेत. पनवेल मतदारसंघामध्ये 6,52,062 एकूण मतदार असून, त्यापैकी 3,82,335 मतदारांनी प्रत्यक्षात मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविला आहे. त्यानुसार या मतदारसंघातील उमेदवारांना 3,82,964 इतकी मते मिळाली आहेत. दरम्यान, 629 इतकी मते अधिकची असून, वाढीव मते आली कुठून, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
याबाबत निवडणूक आयोगाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. विसंगतींचे प्रमाण निवडणुकीच्या निकालांवर त्यांच्या संभाव्य प्रभावाबद्दल प्रश्न निर्माण करते. शेकडो किंवा हजार मतांचा फरक निर्णायक असू शकतो, आणि अशी तफावत अनेक मतदारसंघांमध्ये अस्तित्वात असल्याने निकालांची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी जवळून तपासणी करणे आवश्यक आहे. मतदानाच्या आकडेवारीतील घोळ याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता तो होऊ शकला नाही. त्यामुळे आकडेवारीतील स्पष्टता समजू शकली नाही.