सिडकोच्या मार्गात अडचणी

खारफुटी कत्तलीचा प्रस्ताव पुन्हा सीआरझेडकडे

| उरण | वार्ताहर |

जेएनपीएससह नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एमएमआरडीएकडून वेगाने विकसित करण्यात येत असलेल्या शिवडी-न्हावा-शेवा सी लिंकमुळे नवी मुंबईतील वाहतुकीवर भविष्यात मोठा ताण येणार आहे. यावर उपाय म्हणून सिडकोने जेएनपीए ते उलवे असा आम्र मार्ग नावाचा कोस्टल रोड प्रस्तावित केला आहे.

या प्रस्तावित मार्गासाठी एकूण 64.09 हेक्टर जागा लागणार असून, त्यापैकी 25.70 हेक्टर जागा सीआरझेड क्षेत्रात मोडते. यात खारफुटीचे मोठे नुकसान होणार आहे. यामुळे आता सिडकोस पुन्हा नव्याने या ईआयए अहवालासह सीआरझेड समोर जावे लागणार आहे. सिडकोचा हा प्रस्तावित सागरी मार्ग दोन टप्प्यांत बांधण्यात येणार आहे. या मार्गाची एकूण लांबी 10.107 किमी आहे. हा सागरी मार्ग पूर्ण झाल्यानंतर, भविष्यात जेएनपीटीला जोडणाऱ्या दुसऱ्या लिंक रोडवर आणि राष्ट्रीय महामार्ग 4-बी आणि राज्य महामार्ग 54 मार्गे आम्र मार्गावर येणाऱ्या वाहनांची कोंडी कमी होणार आहे. हा सागरी मार्ग बांधकामाधीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‌‘मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक रूट’शीही जोडला जाणार आहे. यात पहिल्या टप्प्यात आम्र मार्ग जंक्शन ते शिवाजीनगर येथील एमटीएचएल आणि तेथून विमानतळापर्यंत जाणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 5.8 किमीचा रस्ता आहे. या टप्प्यातच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यासाठी 1.20 किलोमीटर लांबीचा रस्ताही बांधण्यात येणार आहे. हा लिंक रोड तरघर रेल्वे स्थानकापासून सुरू होईल आणि नेरुळ-उरण रेल्वे मार्गाने आणि आम्र रोडवरून विमानतळाला जोडण्यात येणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात ते शिवाजीनगर ते जेएनपीटी (बेलपाडा) बांधण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मार्गाची एकूण लांबी 4.306 किमी असेल.
कांदळवनाच्या सुरक्षेसाठी या प्रस्तावित सागरी मार्गाच्या मार्गावर उलवे खाडीच्या काठावर कांदळवन (खारफुटीची) जंगलेही आहेत. त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी नोडल रोड जंक्शन येथे तीन उड्डाणपूल, 1.2 कि.मी. लांबीचे आणि 0.6 कि.मी. लांबीचे दोन आरसीसी स्टिल्ट पूल बांधण्याचे नियोजन आहे. त्याचप्रमाणे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणार्या लिंक रोडसाठी सीवूड-उरण रेल्वे मार्ग आणि आम्र रोडवर 1 उडाणपूल (रेल्वे ओव्हर ब्रिज) (वाया डक्ट) बांधण्यात येणार आहे.

Exit mobile version