| उरण | वार्ताहर |
कर्नाळा पक्षी अभयारण्य परिसरातील दिघाटी – चिरनेर जंगलात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले आहे. जंगलात बिबट्याच्या पायाचे ठसे असल्याची माहिती गणेशोत्सवाच्या काळात ऐकण्यास मिळत असल्याने रहिवाशी भितीच्या सावटाखाली वावरताना दिसत आहेत. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर घटनेची पडताळणी करून बिबट्याचा शोध घ्यावा अशी मागणी शेतकरी, रहिवासी करत आहेत.
पनवेल – उरण या तालुक्याला डोंगर परिसरानी वेढले आहे.या तालुक्यातील कर्नाळा किल्ल्यालगत शासनाच्या अधिपत्याखाली असणारे कर्नाळा पक्षी अभयारण्य असून अनेकवेळा या परिसरातील जंगलात बिबट्या आढळून आलेला असल्याचे या जंगल परिसरातील शेतकरी, रहिवाशांकडून सांगण्यात येत आहे.त्यातच शनिवार दि.23) व रविवार ( दि.24) या दिवसात दिघाटी, चिरनेर गाव परिसरातील शेतकरी, रहिवाशी हे जंगल परिसरात गेले असता पायाचे ठसे असल्याची बाब निदर्शनास आली.
सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे.त्यातच दिघाटी चिरनेर गाव परिसरातील जंगलात बिबट्याच्या पायाचे ठसे असल्याची बाब निदर्शनास आली आहे.तरी वन विभागाचे अधिकारी वर्गाने सदर घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळाची पाहणी करून जंगलात बिबट्याचा वावर असल्यास बिबट्याला जेरबंद करण्यात यावे.
अमित पाटील सरपंच दिघाटी ग्रामपंचायत
कर्नाळा पक्षी अभयारण्य परिसरातील दिघाटी चिरनेर गाव परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल आहे.या जंगलात इतर वन प्राण्याप्रमाणे बिबट्याचा ही वावर असू शकतो.शेतकऱ्यांनी,रहिवाशांनी घाबरून न जाता वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावे.दिघाटी जंगलात पाहणी करण्यात येत आहे.जंगलाचे साम्राज्य या परिसरात मोठ्या प्रमाणात पसरल्याने बिबट्याचा वावर असणार हे नाकारता येत नाही. रहिवाशांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
हेमंत करादे, वन अधिकारी कर्नाळा पक्षी अभयारण्य