ठिकठिकाणी वाहतुक कोंडीने प्रवाशांचे हाल
| रायगड | खास प्रतिनिधी |
पाच दिवसांच्या बाप्पाला आणि गोराईला निराप देऊन चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल झाले. सरकारने कोकणात जाणारा मार्ग काही प्रमाणात सुधारला परंतु परतीच्या मार्गावरच खड्डे कायम आहेत. आता त्याचाच फटका सर्वांना बसतो आहे. महामार्गावर मोठ्या संख्येने वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. मोठ्या संख्येने प्रवाशी मुंबई, ठाण्याकडे निघाल्याने रेल्वे, एसटी बसेस फुल्ल झाल्या आहेत. खासगी वाहनांची संख्या अधिक होती. महामार्गावर वाहनांच्या तीन रांगा लागल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. पेट्रोलपंप, सीएनजीपंपावरती मोठया प्रमाणात गर्दी होती. माणगावपर्यंत सुमारे सहा किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एकाच ठिकाणी वाहतूक अधिक काळ ठप्प झाली नव्हती मात्र वाहनांचा वेग मंदावला होता. आमटेम ते नागोठणे दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पहाटेच्या सुमारास कोंडी कमी झाली. सकाळी पुन्हा वाहने वाढली. वाकण फाटा ते सुकेळी खिंड या भागात लांबच लांब रांगा लागल्या. वाहनांच्या तीन रांगा लागल्याने पुढे एकेरी वाहतूक करताना पोलिसांची दमछाक झाली. या ठिकाणी दिवसभर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. इंदापूर भागातही मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
नागोठणे, कोलाड, माणगाव तसेच पोलादपूर येथील बाजार पेठेच्या ठिकाणी स्थानिक आणि बाहेरील वाहनांमुळे कोंडी झाल्याचे दिसून आले. या ठिकाणची वाहतूक कासव गतीने पुढे सरकत होती. त्यामुळे प्रवाशांना वाहनांमध्ये ताटकळत बसावे लागले. याचा सर्वाधिक त्रास हा लहान मुले, महिला आणि जेष्ठ नागरिकांना झाला. दरम्यान, चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागल्याने अलिबाग शहरातील बस आगारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. महामार्गावर वाहतुक कोंडीने बस गाड्या उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना वाट पाहत बसण्या वाचून पर्याय नव्हता.
काही ठिकाणी वाहने बंद पडण्याचे प्रकार होत होते. त्यामुळे अशा ठिकाणी वाहतुक काही कालावधीसाठी थांबली होती. त्यानंतर तेथे उपाय योजना केल्यावर वाहतूक सुरळीत झाली. रस्ते खराब असल्याने वाहतूक धीम्या गतीने पुढे सरकत होती. मात्र कोठेही मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली नाही.
सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड