व्हेरिटास कंपनीला दिघी ग्रामस्थांचा विरोध

| दिघी | वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यातील दिघी बंदरात व्हेरिटास पॉलिकेम या प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. या कंपनीमुळे रोजगाराची संधी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, यामुळे परिसरात मोठया प्रमाणावर प्रदूषण होणार असल्याच्या भीतीने स्थानिकांनी प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे.

या प्रकल्पाचे काम पूर्णपणे थांबवण्यासाठी ग्रामसभेतील ठरावाचा आधार घेत दिघी ग्रामपंचायतीने जाहीर नोटीस बजावली आहे. दिघी सरपंच विपुल गोरीवले यांनी हे पत्र व्हेरिटास कंपनीला दिले आहे. या पत्रात व्हेरिटास कंपनीकडून विषारी वायू निर्माण होऊन वायुप्रदूषण होणार आहे, असे कारण देत पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी विरोध केल्याचे पत्रात म्हटले आहे. दिघी बंदरात व्हेरिटास कंपनीकडून काम सुरू आहे. त्यालाही ग्रामस्थांनी विरोध करत काम सुरू ठेवल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पत्रात मनुद केले आहे. या प्रकल्पात पीव्हीसी ग्रॅन्युल्स बनवले जातील. जे विविध प्रकारच्या प्लास्टिक वस्तू बनवण्यासाठी इतरत्र पाठवण्यात येईल. पीएमबी म्हणजे प्लास्टिक मिश्रीत डांबर उत्पादन, एलपीजी गॅस बॉटलिंग व सी वॉटर डिसॅलिनेशन असे तीन प्रकल्प होणार आहेत.

व्हेरिटास कंपनीच्या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या बाबी तपासणी करूनच दिली जाते. मात्र ग्रामस्थांची काही तक्रार प्राप्त झाल्यास आम्ही वरिष्ठांना कळवू.

इंदिरा गायकवाड, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण, महाड

पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जनसुनावणीमध्ये विरोध दर्शविला असताना व्हेरिटास कंपनीला परवनागी कशी मिळते? आमचा या कंपनीला शंभर टक्के विरोध आहे.

विपुल गोरीवले, सरपंच, दिघी
Exit mobile version