दिघोडे-चिर्ले मार्गाचे काम अपूर्ण

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या दिघोडे-चिर्ले मार्गाचे काम अद्यापही अपूर्णावस्थेतच आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांची डोकेदुखी वाढणार आहे. हा रहदारीचा मुख्य मार्ग पावसाच्या पाण्यात बुडून गेला आहे. या रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून सुरू असून, आता जुलै महिन्यातही पावसाला जोरदार सुरुवात झाली, तरी देखील या रस्त्याची कामे अपूर्ण आहेत. रस्त्यावर अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, काँक्रिटीकरणाचे काम अजून करण्यात आलेले नाही. आता तर या कोसळणाऱ्या पावसात या मार्गावर पाणी साचून चिखल झाला आहे. त्याचबरोबर वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. तसेच, या रस्त्यावर अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोदण्यात आलेल्या गटारांची कामे अपूर्णावस्थेत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कडेला मातीचे ढीग दिसत आहेत. पावसाच्या पाण्यामुळे खड्डे अधिक खोल होऊन वाहतूक धोकादायक बनली आहे. दुचाकीस्वार, पादचारी, तसेच शालेय विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. अनेक ठिकाणी माती, खडी आणि बांधकाम साहित्य रस्त्यावर पडलेले दिसते. आजूबाजूच्या गोदामांमुळे सांडपाण्याचा योग्य रीतीने निचरा होत नसल्यामुळे या मुख्य मार्गाची पावसात दयनीय अवस्था झाली असून, चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील मोऱ्यांचे काम देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अपूर्ण असल्यामुळे पाणी जाण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे.

Exit mobile version