चित्रलेखा पाटील यांच्या इशाऱ्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाची हालचाल; ग्रामस्थांना दिलासा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
देहेन-भाकरवड गावांना जोडणाऱ्या अपूर्ण पुलामुळे आणि पहिल्याच पावसात वाहून गेलेल्या तात्पुरत्या बंधाऱ्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता. या प्रश्नावर शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पाच दिवसांत पर्यायी व्यवस्था करण्याचा अल्टिमेटम देत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर विभागाने तातडीने दखल घेत पर्यायी पुलाची उभारणी केली. त्यामुळे ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
देहेन-भाकरवड जोडणारा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असून, त्याच्या बांधकामासाठी शासनाने सुमारे दीड कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सप्टेंबरमध्ये कामाला सुरुवात झाली होती. मात्र, वाहतुकीसाठी उभारण्यात आलेला तात्पुरता बंधारा पावसाच्या पहिल्याच सरीत वाहून गेल्याने दोन्ही गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला.
या परिस्थितीची माहिती मिळताच चित्रलेखा पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या. पुलाच्या रखडलेल्या कामाबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर तीव्र नाराजी व्यक्त करत, पाच दिवसांत पर्यायी पूल उभारला नाही तर विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता.
या इशाऱ्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हालचाल करत पर्यायी पुलाचे काम पूर्ण केले. पुलावरून वाहतूक सुरू झाल्याने देहेन आणि भाकरवड गावांतील नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न तात्पुरता मार्गी लागला आहे. दरम्यान, मुख्य पुलाचे कामही पावसाळ्यानंतर तातडीने पूर्ण करून नागरिकांना कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.







