रायगड जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम
| रसायनी | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ करण्यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांच्या संकल्पनेतून डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्याचे प्रयत्न सुरू होते. नुकतेच त्याचे उद्घाटन करण्यात आले.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांनी साकारलेले व विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी दिलेल्या प्रेरणेतून आणि पुनिता गुरव शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रस्नेही शिक्षकांच्या सहाय्याने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण नावाचे “डिजिटल शिक्षणाची नवी दिशा डिजिटल प्रगतीचे एक पाऊल’’ हे डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले आहे. रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक आता एका क्लिकवर-2020 च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पायाभूत स्तर, पूर्वतयारी स्तर, पूर्व माध्यमिक स्तर रचनेनुसार अध्ययन, अध्यापन, खेळ कृती, सहशालेय उपक्रम, स्पर्धा परीक्षा, माझा अभ्यास, तंत्रशिक्षण असे मुख्य पेज असून, पुढे विषय व अध्ययन निष्पत्तीनिहाय दैनंदिन पाठ योजना सहायक उपक्रमाची यात रचना असेल. या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ग्रेडिंग अचूक व थेट करणे सुलभ जाईल. सोबतच विविध सोशल मीडियाच्या जोडण्या सुरक्षा मर्यादेत राहून देण्यात आलेल्या आहेत.
या शैक्षणिक अॅपचे लोकार्पण मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते व अति. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी राहुल कदम, पुनिता गुरव शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी या अॅपच्या निर्मितीत व ई-साहित्य तयार करण्यात मदत करणारे शिक्षक उपस्थित होते. या उपक्रमासाठी नोडल अधिकारी म्हणून सुभाष राठोड यांची नियुक्ती करण्यात आली होती.
हे शैक्षणिक डिजिटल प्लॅटफॉर्म असून यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना दैनंदिन अध्ययन अध्यापन करणे सुलभ होणार आहे. व्हिडिओ, कृतीपत्रिक,क्विज,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असे कार्य या अॅपच्या माध्यमातून सुलभ होईल असा विश्वास आहे.
पुनिता गुरव,
शिक्षणाधिकारी प्राथमिक, राजिप