जि.प.चा हायटेक कारभार;घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी डिजिटल करप्रणाली

। अलिबाग । भारत रांजणकर ।
रायगड जिल्हा परिषदेचा कारभार हायटेक होत असून, जिल्हा परिषदेने डिजिटल करप्रणाली कार्यान्वित केली आहे. यामुळे ग्रामपंचायतींना घरपट्टी वसुली तसेच पाणीपट्टी वसुली करणे तसेच त्याची नोंद ठेवणे सुलभ झाले आहे. ही प्रणाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत विभागाच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ग्रामीण भागात घरपट्टी तसेच पाणीपट्टी कर वसुली करण्यात येते. या कर वसुलीत सुसूत्रता यावी त्याची एकत्रित नोंद राहावी तसेच करदात्यांना ऑनलाइन पद्धतीने घरपट्टी तसेच पाणीपट्टीचा भरणा करता यावा, या उद्देशाने डिजिटल कर प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

या प्रणालीमुळे ग्रामपंचायतींना एका क्लिकवर संपूर्ण करदात्यांची माहिती उपलब्ध होणार आहे. किती घरपट्टी व पाणीपट्टी वसुली झाली, किती वसुली होणे बाकी आहे ही माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यामुळे ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

डिजिटल कर प्रणाली तयार केल्यानंतर या प्रणालीचा चाचणी करण्यात आली. यामध्ये आढळलेल्या उणीव दूर करून, ही प्रणाली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आली आहे. प्रणालीत ग्रामपंचायत निहाय करदात्यांची माहिती भरण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे.

Exit mobile version