। रेवदंडा । प्रतिनिधी ।
चौलला ऐतिहासिक स्थान असून, येथील पुरातन मंदिरे, वास्तू प्राचीन चौलच्या वैभवाचे साक्षीदार आहेत. चौल येथील राजकोट किल्ला मराठ्यांच्या हल्ल्यात जमीनदोस्त झाला. मुसलमान अमदानीत चौलमध्ये प्रांताधिकारांचे मुख्यालय असावे. हे ऐतिहासीक ठिकाण हमामखाना, हजामखाना, कबरस्तान, कलावंतीचा वाडा आदी अनेक वास्तूने सिद्ध होते. चौल मुघल अमदानीत भक्तीस्थान असावे, असे येथील दगडी बांधकामाची आसा मशीद पाहिल्यावर दिसून येते.
चौलनाक्यावरून आग्राव, शितळादेवीकडे जाताना काटकर आळीकडे जाण्याचा मार्ग आहे. येथील हमामखान्याच्या काही अंतरावर कुंडलिका समुद्र खाडी किनारीलगत दगडी बांधकामाची आसा मशिदीचे अवशेष आहेत. चौल काटकर आळीतील नारळ-सुपारीच्या बागायतीकडून या आसा मशिदीकडे जाण्याचा मार्ग आहे. दगडी बांधकामाची आसा मशिदीचे पूर्णतः दुरवस्थेतील अवशेष आढळतात. या आसा मशिदीचे बांधकाम पाहिले असताना मुघल अमदानीत येथे भक्तीचे मोठे स्थान असावे असे दिसून येते.
आसा मशीद पूर्णतः भग्नावस्थेत असून, तिचे दगडी बांधकामाचे अवशेष अद्यापि भक्कम स्थितीत आहे. आसा मशिदीचे उभ्या दगडी खांबावर कोरीव व रेखीव नक्षीकाम पहाण्यासारखे आहे. आसा मशीद पूर्णतः मोडकळीस व दुरवस्थेत असूनसुध्दा तिचे आठ ते दहा दगडी बांधकामाचे अवजड खांब प्राचीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. पुरातत्व खात्याचे या प्राचीन आसा मशिदीकडे दुर्लक्ष केल्याचे निश्चित जाणवते.