खांदा वसाहतीतील वास्तू धुळखात पडून; सिडको, प्रकल्पग्रस्त नेत्यांचे दुर्लक्ष
| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव मिळाले म्हणून राजकीय पुढऱ्यांमध्ये श्रेय वादाची लढाई सुरू आहे. आम्ही किती प्रकल्पग्रस्तांचे कनवाळू आहोत. हे दाखवण्याचा प्रयत्न पुढऱ्यांकडून सुरु आहे. मात्र, त्याच वेळी खांदा वसाहतीत सिडकोच्या माध्यमातून दिबांच्या नावाने प्रकल्पग्रस्तांसाठी प्रशिक्षण केंद्र म्हणून बांधण्यात आलेली वास्तू मात्र धूळ खात पडली असून, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रकल्प ग्रस्तांचे नेतेदेखील याकडे दुर्लक्ष करत असल्याने या बाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
नवी मुंबई, पनवेल परिसरात सिडको मार्फत वसवण्यात आलेल्या वसाहतींसाठी स्थानिकांच्या जमिनी अधिगृहित करण्यात आल्या. अधिगृहित करण्यात आलेल्या बहुतांश जमिनीचा भाग दलदलीचा होता. येथे मिठागरे तर काही भागात, विशेषकरून पावसाळ्यात भातशेती होत असे. या ठिकाणी 95 गांवठाणे असल्याची माहिती सिडको तर्फे देण्यात आली असून, यामध्ये पारंपरिक व्यावसायिक, कारागीर, शेतकरी, मच्छिमारी करणारे, मिठागरे चालविणारे यांचा समावेश होता. त्यांच्यात साक्षरता आणि व्यवसायाचे कौशल्य खूप कमी होते. त्यामुळे भूमिपुत्रांना उपजीविकेकरिता अधिक सक्षमता प्रदान करण्याच्या नैतिक जबाबदारीपोटी नवी मुंबई विकास आराखड्याच्या शिफारसीनुसार, प्रकल्पग्रस्तांच्या राहणीमानातील सुधारणेसाठी व त्यांना सामाजिक आणि आर्थिक बाबतीत शहरातील राहणीमानाशी जुळवून घेता यावे म्हणून सिडकोने विशेष पुनर्वसन उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार विशेष प्रशिक्षण केंद्र, शालेय शिक्षण शिष्यवृत्ती व तंत्रशिक्षण शिष्यवृत्ती जमेल तेवढ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई, पनवेल परिसरात व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार खांदेश्वर मंदिरालगत सेक्टर 2 येथील भूखंडावर बांधण्यात आलेल्या वास्तूला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. दिबांचे नाव देण्यात आलेल्या या वास्तूत कोणत्याही प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण दिले जात नसल्याने वास्तूची दुरवस्था झाली आहे.
लाखो रुपयांची यंत्रसामग्री पडून
व्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या नावावर बांधण्यात आलेल्या या वास्तूत लाखो रुपयांची यंत्रसामुग्री बसवण्यात आली आहे. वापराविना हि यंत्रसामुग्री पडून असल्याचे पाहायला मिळत आहे.
भटक्या मांजरी आक्रमक
दुर्लक्षित असलेल्या या वस्तूचा ताबा सध्या भटक्या मांजराणी घेतला आहे. वास्तूची पाहणी करण्यासाठी जाणाऱ्यांवर या मांजरी हल्ला करण्याचा प्रयत्न करतात.
पालिकेकडे हस्तानंतरण नाही
व्यवसाय प्रशिक्षण केंद्र म्हणून बांधण्यात आलेल्या या वास्तूचे हस्तांतरण पालिकेकडे व्हावे यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करत असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.
माझे वाचनालय सिडकोने नाकारले!
दिवंगत नगरसेवक संजय भोपी यांच्या संकल्पनेतून खांदा कॉलनीमध्ये माझे वाचनालय साकारण्यासाठी पुढाकार घेण्यात आला होता. लोकनेते दि.बा पाटील प्रशिक्षण केंद्रात काहीशी जागा उपलब्ध करून देण्याबाबत विनंती त्यावेळी सिडको कडे करण्यात आली होती. मात्र त्यावेळी प्राधिकरणाने हा प्रस्ताव नाकारला होता.
आरोग्य केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न
2015 साली मच्छिमार्केटसाठी बंद असलेल्या या वास्तुच्या काही भागात खांदा वसाहतीमधील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्यात यावे या साठी पालिकेतील तत्कालीन विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी प्रयत्न केले होते. म्हात्रे यांनी केलेल्या प्रयत्नानंतर आरोग्य केंद्र बनवण्यासाठी पालिकेच्या उपायुक्तांनी जागेची पाहणी केली होती.
