| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
पनवेल शहरातील बल्लाळेश्वर मंदिर परिसरातील श्री गणेश विसर्जन घाटासाठी उभारण्यात येत असलेले भव्य प्रवेशद्वार आणि संबंधित काम गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहे. कोट्यवधी रुपयांच्या या कामाचे लोकार्पण नेमके कधी होणार, असा प्रश्न आता पनवेलकर आणि गणेशभक्तांकडून उपस्थित केला जात आहे.
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना विसर्जन घाटाच्या कामाची स्थिती पाहता यंदा तरी हे काम पूर्ण होऊन लोकार्पण होण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. दरम्यान, पनवेल महापालिकेचे नवे शहर अभियंता यांनी या कामाची पाहणी केल्याची माहिती आहे. त्यामुळे रखडलेल्या कामाला आता गती मिळणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
विसर्जनासाठी पालिकेची पर्यायी व्यवस्था काय?
बल्लाळेश्वर मंदिर परिसरातील विसर्जन घाटावर गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने गणेशभक्त आणि गणेशमूर्ती येतात. शहरातील विविध भागांतून येणाऱ्या मंडळांसह घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी ही या परिसरात गर्दी होते. त्यामुळे यंदा घाटाचे काम अपूर्ण राहिल्यास गणेश विसर्जनासाठी महापालिका कोणती पर्यायी व्यवस्था करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पनवेल शहरात यापूर्वीही विविध ठिकाणी गणेश विसर्जनासाठी घाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.
वाहतूक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे आव्हान
विशेष म्हणजे याच मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. परिसरातील शाळांमध्ये ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. गणेशोत्सवाच्या काळात भाविकांची गर्दी, वाहनांची वाढलेली संख्या आणि विसर्जनासाठी येणाऱ्या मिरवणुकांमुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीची शक्यता आहे. त्यामुळे गणेशभक्तांच्या सुरक्षिततेबरोबरच विद्यार्थी आणि नियमित वाहनचालकांची सुरक्षितताही महत्त्वाची ठरणार आहे.
महापालिकेने विसर्जन घाटाचे काम, वाहतूक नियोजन, बॅरिकेडिंग, प्रकाशव्यवस्था, सुरक्षा कर्मचारी आणि भाविकांच्या ये-जा करण्यासाठी स्वतंत्र मार्ग याबाबत स्पष्ट नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दोन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामाचे लोकार्पण यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी होणार की पुन्हा प्रतीक्षाच करावी लागणार? याकडे पनवेलकरांचे लक्ष लागले आहे.







