दगडी भिंत हटवण्याची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील मिरचोली येथील आदिवासी कातकरी कुटुंबाच्या जमिनीवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे दगडी बांधकाम करून कंपाऊंड उभारल्याचा आरोप आदिवासी शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत कर्जत श्रमजीवी संघटना कर्जत यांनी आदिवासी कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला असून, आदिवासी शेतकऱ्यांचा हक्काच्या जमिनीचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे. दरम्यान नेरळ पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस तक्रार नोंदवली आहे.
बायवाबाई वाघमारे आणि संगीता वाघ यांनी नेरळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच कर्जतचे प्रांत अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे. ही जमीन त्यांच्या कातकरी आदिवासी कुटुंबाच्या हक्काची असून, संबंधित जमिनीच्या हस्तांतरणास बंदी असताना जमीन बळकावली आहे. या जमिनीवर कोणीही ताबा घेऊ नये, बिगर आदिवासी व्यक्तींनी बळकावू नये यासाठी संबंधित ठिकाणी आदिवासी जमीन असल्याचे सूचना फलक लावण्यात आले होते. मात्र, त्या धनदांडग्याने हा सूचना फलक जबरदस्तीने उपटून फेकण्यात आल्याचा तसेच त्या ठिकाणी सिमेंट-काँक्रीटचे दगडी बांधकाम यांचे कुंपण घालण्यात आले आहे.
या प्रकारामुळे आदिवासी कुटुंबाच्या हक्काच्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. तसेच नेरळ पोलिसांनी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करावा आणि उभारण्यात आलेले बेकायदेशीर वॉल कंपाऊंड तात्काळ हटवावे, अशीही मागणी तक्रार अर्जातून करण्यात आली आहे.







