पारंपारिक अंत्यसंस्कार करण्याकडे कल
। पालघर । प्रतिनिधी ।
पर्यावरणाच्या रक्षणासाठी वसई-विरार महापालिकेने तयार केलेल्या गॅस दाहिन्या बंदच असल्यामुळे नागरिकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. पालिकेच्या देखभाली अभावी 5 पैकी 2 गॅस दाहिन्या बंद झाल्या आहेत. या गॅस दाहिन्यांचा वापर करण्यासाठी पालिकेने तयार केलेली प्रोत्साहन योजना देखील कागदावरच राहिली आहे. यातच नायगाव येथील स्मशानभूमीची दूरवस्था झाली असल्यामुळे नागरिकांना मोबाईलच्या प्रकाशावर अंत्यविधी करावा लागला असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पारंपरिक स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याने पर्यावरणाचा र्हास होतो शिवाय प्रदूषण होत असते. एका मृतदेहाचे दहन करण्यासाठी साधारण साडेचारशे ते पाचशे किलो लाकडे लागतात. याचा खर्च सुमारे अडीच हजार रुपये एवढा येतो. लाकडांसाठी जंगलात वृक्षतोड होऊन वनसंपदा नष्ट होत असते. मृतदेहाचे दहन केल्याने सतत प्रदूषण होत असते. दहनाच्या वेळी होणारे हे विविध प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरणपूरक अंत्यविधी व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रमाअंतर्गत (नॅशन क्लिन एअर प्रोग्राम) सर्व महापालिकांना गॅस दाहिन्या लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. वसई-विरार शहर पाालिकेने साडेतीन कोटी खर्च करून नवघर, पाचूबंदर, विराट नगर, आचोळा आणि समेळपाडा या 5 ठिकाणच्या स्मशानभूमीत गॅस दाहिन्या सुरू केल्या होत्या. मात्र, त्याला थंड प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, विरारच्या विराट नगर आणि नालासोपारामधील समेळपाडा स्मशानभूमीतील गॅस दाहिन्या बंद पडल्या आहेत. मागील वर्षात आचोळ्यात 224, नवघरमध्ये 43 तर पाचूबंदर येथे 102 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. समेळपाडा येथील गॅस दाहिनीत एकदाही वापर झाला नव्हता. अखेर ती बंद पडली आहे.
पालिकेची योजना कागदावरच
गॅस दाहिनीऐवजी नागरिक आपल्या कुटुंबियांचे अंत्यसंस्कार पारंपरिक पध्दतीनेच करत आहेत. यामुळे या गॅस दाहिन्या विनावापराच्या पडून आहेत. गॅस दाहिन्यांच्या वापर होत नसल्याने पालिकेला लाकडांचा खर्च करावा लागत आहे. पारंपरिक पध्दतीने अंत्यसंस्कार केल्यामुळे वृक्षतोड होते. हे रोखण्यासाठी पालिकेने जनजागृती करण्याचे ठरवले होते. याचाच भाग म्हणून जे नागरिक आपल्या नातलगांच्या मृतदेहांचे अंत्यसंस्कार गॅस दाहिनीत करतील त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला जाणार होता. तसेच, त्यांना मालमत्ता करातही 5 टक्के सवलत देण्यात येणार होती. मात्र, या योजना कागदावरच राहिल्या आहेत.
मोबाईलच्या उजेडात अंत्यसंस्कार
नायगाव पश्चिम कोळीवाडा परिसरात अंत्यसंस्कारासाठी बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. विशेषत: विजेअभावी ग्रामस्थांना रात्री मोबाईल टॉर्चच्या उजेडात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. या स्मशानभूमीत विजेची सोय नसल्याने रात्रीच्या वेळी मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे अवघड झाले आहेत. नुकतेच नायगाव कोळीवाडा भागातील एक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी या स्मशानभूमीत आणण्यात आला होता. मात्र विजेअभावी मोबाईल टॉर्च आणि दुचाकीच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.