सुतारवाडी लघु पाटबंधारे चौकीची दुरवस्था

| गोवे-कोलाड | वार्ताहर |

सुतारवाडी गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर सुतारवाडी लघुपाटबंधारे चौकी आहे. या चौकीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी चौकीदार नाही. चौकीदार नसल्यामुळे सभोवतालचा परिसर अस्वच्छ दिसत असून पावसाळ्यात या ठिकाणी गवताचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर असते.

धरणाची देखरेख करण्यासाठी या ठिकाणी 30 गुंठे जमिन घेऊन त्यामध्ये सुसज्ज अशी चौकी बांधली होती. सुरुवातीला अनेक वर्ष या ठिकाणी चौकीदार वास्तव्यास होता. सन 2015 ला वादळी पावसात चौकीच्या छपराचे पत्रे उडाले तेव्हापासून छपरावर पत्रे नाहीत की चौकीदार वास्तव्यास नाही. या परिसरात फार्म हाऊसची संख्या झपाट्याने वाढली आहे. लघुपाट बंधारे त्या फार्ममालकाकडून पाणीपट्टी 4 लाखापर्यंत वसूल करत असतो. परंतु चौकी दुरुस्त करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी चौकीदार नेमण्याचे धाडस पाठबंधारे विभाग करत नाही. गेल्या 2015 पासून दरवर्षी अंदाजपत्रक पाठविले जाते. परंतु आज तगायत त्याची दख्खल न घेता केराची टोपली दाखवली गेली. सुतारवाडी लघुपाट बंधारे विभागाचे या चौकीकडे गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्ष आहे. शेतकरी वर्गाला पाणी कमी आणि फार्म हाऊस मोठ्या प्रमाणावर अशी अवस्था या पाटबंधारे विभागाची आहे.

Exit mobile version