| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवरीलल चांदई पुलावर अगणित आणि मोठे खड्डे पडलेले आहेत. त्या खड्ड्यंमुळे हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमार्ग रस्त्यावरील पूल आहे काय, असा प्रश्न पडतो अशी संतप्त भावना स्थानिक रहिवासी आणि शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग बागडे यांनी व्यक्त केली आहे.
चिंचवली-कडाव-तांबस या राज्यमार्ग रस्त्यावर उल्हास नदीवर चांधई गावाजवळ नवीन पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरु आहे. मात्र, त्या नदीवर बांधण्यात आलेला जुन्या पुलाची अवस्था दयनीय आहे. दहा वषंपूर्वी बांधलेल्या पुलाच्या बाजूला नवीन पूल बांधण्यात येत आहे. तेथे असलेला जुना पूल हा अरुंद असल्याने नवीन पूल बांधण्याची मागणी अनेक वर्षे केली जात होती. मात्र, जुन्या पुलावरील पृष्ठभाग हा खड्ड्यांनी व्यापला असून, पुलावरून वाहतूक करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी पांडुरंग बागडे यांनी केली आहे.